Lawrence Bishnoi : सलमानच्या जीवावर उठलेल्या लॉरेन्स बिश्नोईवर येणार वेबसीरिज ? नाव काय ठरलं ? अनेक रहस्य उलगडणार
कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या बराच चर्चेत आहे. बाबा सिद्दीकी यांची हत्या त्याच्या टोळीच्या शूटर्सनी केली असून त्याची जबाबदारी स्वीकारणारी पोस्टही सोशल मीडियावर टाकण्यात आली होती. याच लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिज येणार असल्याचे वृत्त असून लवकरच त्याचं पोस्टर लाँच होणार आहे. या वेबसीरिजचं नाव काय असेल ?, त्यात मुख्य भूमिका कोण साकारणार ? जाणून घेऊ सर्व डिटेल्स
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या तसेच अभिनेता सलमान खान याला सतत मिळणाऱ्या धमक्या यामुळे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई प्रचंड चर्चेत आहे. एप्रिल महिन्यात लॉरेन्सच्या टोळीतील शूटर्सनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला, त्यानंतर सलमानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. तर आता आठवडाभरापूर्वीच ( 12 ऑक्टोबर) सलमानचा खास मित्र असलेले आणि राजकारणी बाबा सिद्दीकी यांची लॉरेन्सच्या गँगमधील शूटर्सनीच निर्घृण हत्या केली. सध्या लॉरेन्स हा गुजरातच्या साबरमती तुरूंगात कैद आहे. याचदरम्यान लॉरेन्सबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
या कुख्यात गुंडाच्या आयुष्यावर आधारित चक्क एक वेबसीरिज येणार आहे. जानी फायर फॉक्स फिल्म प्रॉडक्शन हाऊसने लॉरेन्स बिश्नोई याच्यावर आधारित वेब सिरीजची घोषणा केली आहे. गुंडाच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिज म्हटल्यावर त्यात ॲक्शन, हिंसा, मारामारी तर येणारच. ही वेबसीरिज कधी येणार, त्याचं नाव काय असेल, त्यात मुख्य भूमिका कोण साकारणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. यमात्र या वेबसीरिजच्या घोषणेमुळे सलमानच्या चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लॉरेन्सचं नाव पुन्हा चर्चेत आलं. सलमानशी असलेली जवळीक हीच बाबा सिद्दीकींच्या जीवावर बेतल्याची चर्चा आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या शूटर्सनीच सिद्दीकी यांची भररस्त्यात गोल्या झाडून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यत चौघांना अटक केली असून तपासाची चक्र वेगाने फिरत आहेत, रोज नवनवे खुलासे होत आहेत.
काय असेल लॉरेन्स बिश्नोईच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिजचं नाव ?
‘न्यूज 18’ ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यांच्यारिपोर्टनुसार, जानी फायरफॉक्स फिल्म प्रॉडक्शन हाऊस हे लॉरेन्सच्या आयुष्यावर आधारित वेबसीरिज बनवणार असून ‘लॉरेन्स: अ गँगस्टर स्टोरी’ असं त्याचं नाव असेल. इंडियन मोशन पिक्चर असोसिएशने हे नाव अप्रूव्ह केल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एका पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा असलेला लॉरेन्स गुन्हेगारी जगताकडे कसा वळला, गुन्ह्याच्या जगात त्याने पहिलं पाऊल कधी टाकलं, त्याच्या आयुष्यातील वादविवाद, अशा अनेक घटना या वेबसीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
कोण साकारणार मुख्य भूमिका, रिलीज कधी ?
सध्या फक्त या वेबसीरिजचं नाव फायनल करण्यात आलं आहे. मात्र या वेबसीरिजमध्ये लॉरेन्सची मुख्य भूमिका कोणता अभिनेता साकारणार आहे, इतर कास्ट काय असेल, तसेच त्याची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, लवकरच या गोष्टींची माहिती देखील जाहीर करण्यात येईल, असं समजतं.
प्रॉडक्शन हाऊस हेड अमित जानी यांच्या सांगण्यानुसार, या वेबसीरिजमधून ते या गँगस्टरची खरी कहाणी आणि त्याचा प्रत्येक पैलू लोकांसमोर आणायचा आहे. या प्रॉडक्शन हाऊसने यापूर्वीही अनेक खऱ्या घटनांवर आधारित चित्रपट बनवले आहेत. कराची टू नॉएडा सारख्या त्यांच्या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती, तो चित्रपट सचिन आणि सीमा हैदर यांच्या आयुष्यावर आधारित होता.
मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीमध्ये या वेबसीरिजचं पोस्टर रिलीज होऊ शकतं, त्याच दिवशी वेबसीरिजमधील मुख्य भूमिका कोण साकारणार त्याच्या नावाचीही घोषणा होण्याची शक्यता आहे.
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैद आहे. तेथे त्याला हाय सेक्युरिटी झोनमध्ये ठेवण्यात आल आहे. लॉरेन्स बिश्नोई गेल्या काही वर्षांत तीन मोठ्या हत्यांप्रकरणी केवळ भारताच्याच नव्हे तर कॅनडाच्या पोलिसांच्याही रडारवर आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसावालाची हत्याही त्याच्याच टोळीतील गुंडांनी केली होती.