कोयता खरेदीसाठी पैशांसोबत काय द्यावं लागणार, कोयता खरेदी कोणती नवी अट?
पुणे शहर पोलीसांनी गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गॅंगची दहशत मोडून काढण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यात आता नवीन नियम लागू केला आहे.
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर परिसरात कोयता गॅंगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पुणे शहरातील कुठल्या ना कुठल्या भागात हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड करणे, घरांवर हल्ला करणे, नागरिकांना दमदाटी करून लूट करणे अशा स्वरूपाच्या विविध घटना शहरात घडल्याचे समोर आले होते. यावरून पुणे शहर पोलीसांनी विविध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काही ठिकाणी संशयित आरोपींची पोलीसांनी धिंडही काढली आहे. काहींना तर भररस्त्यात चोप देऊन धडा शिकविण्याचे काम केले आहे. तरी देखील कोयता गॅंगचा धुमाकूळ सुरूच असल्याने पुणे पोलीसही आक्रमक झाले आहे.
कोयता खरेदी-विक्रीसाठी नियम पुणे शहरात कोयता गॅंग म्हणजे चर्चेचा विषय झाला आहे. टवाळखोरांसहित गुंडांच्या मध्ये हातात कोयता घेऊन फिरणे एक प्रकारची पॅशनच सुरू झाली आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये कोयता वापर सर्रासपणे केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कोयता खरेदी विक्रीसाठी नियम लागू केला आहे. कोयता खरेदी करतांना आधारकार्ड देणे बंधनकारक केले आहे. दुकानदाराला त्याबाबतची नोंद ठेवावी लागणार आहे.
पुणे पोलिसांचे असं असेल नियंत्रण कोयता खरेदी केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आधारकार्ड मिळणार आहे. कोयता खरेदी केल्यानंतर त्याचा शोध घेऊन अगोदरच तपासणी करणार आहे. कोयता खरेदी करण्यामागील कारण काय आहे. त्यामध्ये कुठलाही संशय आल्यास पोलीस थेट कारवाई करणार आहे.
टवाळखोरीला खरोखर आळा बसेल ? खरंतर पुणे शहरापुरताच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खरेदी करण्याऐवजी ग्रामीण भागात जाऊन टवाळखोर किंवा गुंड कोयता खरेदी करू शकणार आहे. त्यामुळे शहरात अटी घालण्यात आल्या असल्या तरी धुमाकूळ घालणाऱ्यांना यानिमित्ताने चाप बसेल की नाही याबद्दल शंका आहे.
गुंडांकडून कोयत्याचाच वापर का ? कोयता खरेदी करतांना अल्पदरात मिळतो. बाळगन्यासही कोयता सोपा असतो. खरेदी करण्यासाठी अडचण येत नाही. हार्डवेअरच्या दुकानातही कोयता उपलब्ध होतो. शेतीकामात लागतो म्हणून कुठेही खरेदी करता येतो. त्यामुळे कोयत्याचा वापर सर्रासपणे होत असतो.