अमरोहा | 21 सप्टेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये एक कैदी गाडीतून उडी मारून पळाला. पोलीस त्याला रात्रभर शोधत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याला अखेर पकडलंच. त्याला पकडण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. त्यात त्याच्या पायाला गोळी लागली. जखमी झाला अन् पोलिसांच्या तावडीत आला. त्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्याचं पळून जाण्याचं कारण पोलिसांनी विचारलं. त्यावेळी पोलिसांना जे काही कळलं त्यामुळे पोलीसही चक्रावून गेले. कैद्याने जे सांगितलं ते एखाद्या सिनेमाची कथा शोभावी असं होतं. नेमकं काय सांगितलं बरं त्याने?….
ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. वाजिद अली असं या कैद्याचं नाव आहे. मुरादाबाद तुरुंगातून पोलीस व्हॅनमधून त्याला अमरोहाला आणलं जात होतं. यावेळी अमरोहा- जोया रोडवर त्याने चालत्या व्हॅनमधून उडी मारली. पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त असतानाही कैदी पळून गेल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांवर टीका होऊ लागली. बरं आरोपी साधाच गुन्हेगार होता. तो काही गँगस्टर नव्हता. तरीही साध्या कैद्यालाही पोलीस संभाळू शकली नसल्याने खळबळ उडाली.
वाजिद पळाल्याने पोलिसांच्या तोंडचं पाणी पळालं. आता घरी जाणंही मुश्कील झालं. नाईलाजाने पोलिसांना रात्रभर वाजिदचा शोध घ्यावा लागला. अख्खी रात्र उलटली पण वाजिद काही सापडला नाही. यावेळी निष्काळीपणाचा ठपका ठेवून एव्हाना वाहन चालकासह तीन पोलिसांना निलंबितही करण्यात आलं.
मंगळवारी सकाळी वाजिद आणि अमरोहा पोलिसांदरम्यान चकमक उडाली. यावेळी पळणाऱ्या वाजिदला शरण येण्यास पोलिसांनी सांगितलं. पण त्याने ऐकलं नाही. शेवटी पोलिसांनी नेम धरला अन् त्याच्या पायावर गोळी झाडली. त्यामुळे वाजिद खाली कोसळला. पायातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. त्याला चालताही येत नव्हतं. नंतर पोलिस आले आणि त्याला अटक केली. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला. त्याची साक्ष घेण्यात आली.
त्यानंतर वाजिदने जे सांगितलं त्याने पोलीस अक्षरश: चक्रावून गेले. तो बोलू लागला. पोलीस ऐकत होते. भुवया उंचावत होत्या. वर्षभरापूर्वी मुरादाबाद तुरुंगात त्याची मैत्री रिजवान नावाच्या कैद्याशी ओळख झाली. तुरुंगात वाजिदची बायको त्याला नेहमी भेटायला यायची. वाजिदने त्याच्या पत्नीची रिजवानशी ओळख करून दिली. त्यानंतर वाजिदच्या बायकोचे आणि रिजवानचे सूर जुळले. रिजवान तुरुंगातून बाहेर आला आणि तडक वाजिदच्या घरी गेला. वाजिदच्या बायकोसोबत रिजवान पळून गेला. याची माहिती वाजिदला कळताच तो भडकला. पण तुरुंगात असल्याने तो काहीच करू शकत नव्हता.
तो संधीची वाट पाहत होता. अन् सोमवारी ती संधी त्याला चालून आली. सोमवारी त्याला तुरुंगात हजेरीसाठी आणण्यात येत होतं. त्याचवेळी त्याने डाव साधला अन् पोलीस व्हॅनमधून उडी मारून फरार झाला. पण अवघ्या काही तासातच पोलिसांनी वाजिदला पकडलं. त्यामुळे त्याचा प्लॅन उधळला गेला. वाजिदकडे बंदूक आणि जिवंत काडतूसे सापडली आहेत.