आई-बाबांचा रोष पत्कारत लव्हमॅरेज केलं, पण लग्नानंतर तरुणीची अवघ्या 20 दिवसांत आत्महत्या
देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या कुटुंबियांचा विरोध असताना आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 20 दिवसांत तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या कुटुंबियांचा विरोध असताना आपल्या प्रियकरासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अवघ्या 20 दिवसांत तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतक तरुणीचा पती हा तिच्या मृत्यूनंतर बेपत्ता झाला आहे. त्याच्या वागणुकीमुळेच तरुणीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पोलीस आरोपी पतीचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित घटना ही दिल्लीच्या पटेल नगर भागात घडली आहे. मृतक तरुणीचं नाव नेहा चौहान असं आहे. तर आरोपी पतीचं राहुल बाथम असं नाव आहे. विशेष म्हणजे मृतक नेहा आणि आरोपी राहुल यांची तीन महिन्यांपूर्वीच ओळख झाली होती. नेहा शहरातील एका शोरुमजवळील एका खासगी कार्यालयात नोकरी करायची. कार्यायलात येता-जाताना तिची ओळख राहुलसोबत झाली. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.
पतीला त्रासाला कंटाळूने नेहाची आत्महत्या
नेहा आणि राहुल यांनी दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. पण नेहाच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. पण कुटुंबियांचा रोष पत्कारत नेहाने राहुलसोबत एका मंदिरात लग्न केलं. दोघांचं लग्न 22 ऑगस्ट रोजी झालं. पण लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी राहुलची वागणूक बदलली. तो तिला मारहाण करु लागला. यानंतर पती-पत्नीत वारंवार वाद होऊ लागला. राहुल हा दारु पित असल्याचं नेहाला लग्नानंतर कळालं. राहुलकडून सातत्याने सुरु असलेल्या छळाला कंटाळून नेहाने अखेर 12 सप्टेंबरला आत्महत्या केली. आत्महत्येच्या आधीच्या रात्री नेहाचं पती राहुलसोबत कडाक्याचं भांडण झालं होतं. त्यानंतर दोघं घरात झोपले होते. पण दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला जाग आली तेव्हा घरात नेहाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानंतर राहुल फरार झाला.
नेहाच्या कुटुंबियांची पोलिसांत तक्रार
या घटनेप्रकरणी नेहाच्या कुटुंबियांनी पती राहुल विरोधात पोलिसात तक्रार केली आहे. आरोपीने नेहाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. याशिवाय आरोपी पतीदेखील फरार आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. नेहाच्या कुटुंबियांनी आरोपीविरोधात कठोरात कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :
अमरावतीत आर्थित विवंचनेतून शेतकऱ्याच्या मुलीची आत्महत्या, मन सुन्न करणारी सुसाईड नोट समोर