घरात पाळणा हलत नाही म्हणून शेजारणीचा जीव घेतला; ‘या’ संशयातून धारदार शस्त्राने केली हत्या
कोरिया जिल्ह्यातील पोधी गावात एका महिलेला तिच्या शेजाऱ्याने केवळ जादूटोणा केल्याचा संशय आल्याने ठार मारले. शेजारणीने केलेल्या जादूटोण्यामुळे पत्नीला मूल होत नसल्याचा संशय शेजाऱ्याला आला होता.
रायपूर : लग्नानंतर बराच काळ उलटूनही घरात ‘गुड न्यूज’ ऐकायला मिळत नसेल, तर माणूस वाट्टेल ते उपाय करायला लागतो. कुणी देवाजवळ दिवस-रात्र हात जोडून बसतो, तर कुणी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेत राहतो. अशा उपायांनंतरही अपयश आल्यामुळे एका व्यक्तीने चक्क त्याच्या शेजारणी (Neighbour)ची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या (Murder) केली. शेजारणीने जादूटोणा (Witchcraft) केला असावा, या संशयातून तिची हत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
जादूटोण्याच्या समस्येवर कठोर कायदे केल्याचा दावा करणाऱ्या छत्तीसगडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अंधश्रद्धेमुळे आजही निष्पाप लोकांचे प्राण घेतले जात असल्याचे या घटनेवरुन स्पष्ट झाले आहे.
विशेषत: ग्रामीण भागात जादूटोण्यामुळे भांडणे, तंटे वाढून अशा घटनांना निमंत्रण मिळत आहे.
शेजारणीने जादूटोणा केल्याचा संशय
कोरिया जिल्ह्यातील पोधी गावात एका महिलेला तिच्या शेजाऱ्याने केवळ जादूटोणा केल्याचा संशय आल्याने ठार मारले. शेजारणीने केलेल्या जादूटोण्यामुळे पत्नीला मूल होत नसल्याचा संशय शेजाऱ्याला आला होता.
याच संशयातून त्याने कालेसिया उर्फ कौशिल्या या 50 वर्षीय महिलेची लोखंडी धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. शुक्रवारी सायंकाळी नवाडीह परिसरात ही घटना घडली.
धारदार शस्त्राने वार केले आणि पळ काढला!
हत्येप्रकरणी मृत महिलेचा पती प्रेमसे पांडो याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कलेसिया ही अंघोळ करून घरी येत होती.
याचदरम्यान गावातील उमेशकुमार केवट याने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केला आणि घटनास्थळावरून पळ काढला, असे तक्रारदार पांडोने पोलिसांना सांगितले.
परिसरात नाकाबंदी करून आरोपीला अटक
हत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक तयार करण्यात आले होते. आजूबाजूच्या परिसरात नाकाबंदी केल्यानंतर अखेर आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपी उमेशला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हत्येमागील धक्कादायक कारणाचा उलगडा केला. मृत महिला अधूनमधून शिवीगाळ करायची. तिच्यामुळेच माझी पत्नी नेहमी आजारी असायची. परिणामी तिला मूल होत नव्हते. यामागे तिने जादूटोणा केल्याचा संशय आला आणि तिला ठार मारण्याचा कट आखला, असे आरोपी उमेशने पोलिसांना सांगितले.
रस्त्यात एकटी असल्याचे पाहून हल्ला
शनिवारी सायंकाळी मृत महिला तलावावरून घरी परतत होती. ती एकटी असल्याची संधी साधून उमेशने तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात तिचा मृत्यू झाला. हत्येत वापरलेले लोखंडी शस्त्र पोलिसांनी जप्त केले आहे.
आरोपी उमेश कुमार केवट हा 22 वर्षांचा असून त्याच्याविरुद्ध आयपीसी कलम 302, एससी-एसटी अॅक्टसह अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याची तुरुंगात रवानगी झाली आहे.