बापरे! सोलापुरात भर दिवसा रस्त्यावर दरोडा, पोलिसांचं भय आहे की नाही? नेटीझन्सकडून संताप व्यक्त
सोशल मीडियावर एका महिलेची पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. ही महिला कुटुंबासह सोलापूर-उमरगा रोडने प्रवास करत असताना भर दिवसा दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. महिलेने आपल्यासोबत घडलेली सर्व घटना पोस्टमध्ये लिहिली आहे.
मुंबई | 19 जानेवारी 2024 : सोशल मीडियावर सध्या एका महिलेची पोस्ट खूप व्हायरल होत आहे. श्वेता हुले असं या महिलेचं नाव आहे. या महिलेने सोलापूर-उमरगा रोडवर आपल्याला आलेल्या अनुभवाबद्दल फेसबुकवर सविस्तर लिहिलं आहे. ही महिला आपल्या कुटुंबासोबत किया कंपनीच्या कारमधून प्रवास करत होती. या दरम्यान सोलापूर-उपरगा रोडवर भर दिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास काही दरोडेखोरांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. या दरोडेखोरांनी त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. महिलेचं कुटुंब कसंतरी तिथून निसटलं. त्यांची गाडी सोलापुरात आली तेव्हा त्यांना एका वाहतूक पोलीस कर्मचारी भेटला. महिलेच्या कुटुंबियांनी या पोलीस कर्मचाऱ्याला सांगितलं. पण त्याने कोणतीही मदत न करता तुम्हीच या मुद्द्यावर आवाज उचला. आम्हाला इथे राहायचं आहे. त्यामुळे आम्ही काही करु शकत नाही, असं सांगितलं. महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे. महिलेच्या फेसबुक पोस्टवर अनेकांनी वेगवेगळे अनुभव शेअर केले आहेत.
महिलेने फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
“साधारण ८-१० दिवसांपूर्वीची घटना आहे ही… माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे 2 मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सोलापूरकडे येत असताना, भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ईटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना, एक उंच, काळाकुट्ट, भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड रॉड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला.”
“गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता. त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली. त्याला लक्षात आले की हा माणूस आता आपल्याला अडवून लूटमार करणार. तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता. पण नविन kia seltos च्या ADAS फीचर्सच्या Auto Emergency Breaks या नवीन फीचरमुळे ती व्यक्ति समोर आल्यामुळे अचानक जोरात ब्रेक लागून गाडी जागेवर थांबली. गाडीचा स्पिड खूप जास्त होता. तेवढ्याच जास्त स्पिडमध्ये गाडी जागेवर थांबली. त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईलावगैरे थोडा मार लागला. लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला. आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले.”
“लगेच शेतामध्ये लपलेले ६-७ दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी आणि रॉडसारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले. मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती. तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला. पण काच फुटली नाही. त्यामुळे ते आणखी जास्तच चवताळले. त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण 1 किलोमीटरपर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते. मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो.”
“पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रकही असाच दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता. आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती. आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा, गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकाऊ लागला. आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते. गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते. तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली. त्याचक्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली. आणि कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले. या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहोत.”
“एकतर नविन kia seltos च्या ADAS फीचर्सचा Auto Emergency Breaks हे फीचर आपल्या सुरक्षेसाठी असेल यामुळे अपघात टाळू शकतो असं वाटलं. मात्र या घटनेमुळे या फीचर्समुळे किती मोठ्या संकटात सापडू शकतो, किती भयानक किंमत यामुळे मोजावी लागली असती कल्पनाच न केलेली बरी..”
“दुसरी गोष्ट म्हणजे… तिथून कसा तरी जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले. आणि पुढे येऊन त्यांनी 112 नंबरवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले की तिथेच थांबा, आम्ही येत आहोत. त्यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळत नाहीये. तिथेच थांबा म्हणजे त्या दरोडेखोरांकडून जीव गमावून घ्या, मार खावा, तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच तिथे, असा अजिबात होत नाही बर का”
“या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभी केली. स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमके काय करावे. यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले. तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलीस तिथे आले, त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली. विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही? त्यांनी उत्तर दिले कि आम्ही तिथेच राहतो. त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही. तुम्ही बोला, तुम्ही आवाज उठवा”
“आपण जर सोलापूर-उमरगा किंवा उमरगा-सोलापूर प्रवास करत असाल तर सावध राहा. या रोडवर भरदिवसा ढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत. तुमचा जीवही घ्यायला ही लोक पुढे मागे पाहत नाहीत. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत…”
“भयानक घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत. या हायवेवर प्रवास करणार्यांना सावध करावे म्हणून ही पोस्ट केली आहे. ही घटना फक्त आज घडली असे नाही, या पोस्टनंतर बरेच फोन आणि मेसेज आले आहेत. बर्याच जणांना हा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासुन आले आहेत. या रोडवर बर्याच जणांचे गाड्या अडवून त्यांना लुटले गेले आहे. आम्ही याची रितसर तक्रार केली आहे. त्यावर सुरू आहे, कारवाई करण्याची त्यांच्या परीने प्रक्रिया… पण आपल्या सर्वांपर्यंत ही घटना पोहोचवून आपल्याला सावध करावे यासाठी हा लेख प्रपंच…. त्यामुळे विनंती आहे इथून जाता-येताना सावध राहा.”
पोलिसांना दरोडेखोरीच्या घटनांची माहिती नाही?
सोलापूर-उमरगा रोडवर दरोड्याच्या इतक्या भयानक घटना भर दिवसा घडत आहेत, पण पोलिसांना अशा घटनांची माहिती नाही हे विशेष आहे. आता तरी पोलिसांनी या प्रकरणी काहीतरी कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरीक आणि प्रवाशांकडून केली जात आहे. आपण पर्यटनाबद्दल बोलतो. पर्यटनाला चालना मिळावी म्हणून प्रयत्न केले जातात. पण प्रवाशीच सुखरुन नसतील तर पर्यटनाला काय चालना मिळेल? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.