अंबरनाथमध्ये महिलेचा पाठलाग करणाऱ्या रोड रोमिओला चोप, पण पोलिसांकडून कारवाईची उदासीनता?
अंबरनाथमध्ये एका विवाहित महिलेला रोड रोमियोने त्रास दिला. स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले, पण पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून त्याला सोडून दिले, असा आरोप केला जातोय. तसेच आरोपीच्या पुन्हा संबंधित परिसरात चकरा सुरु झाल्याने पीडित महिला आणि तिचे कुटुंब दहशतीत आहेत.
मयुरेश जाधव, Tv9 प्रतिनिधी, अंबरनाथ : राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेवर सातत्याने चर्चा होते. पण तरीही काही ठिकाणी अनपेक्षित आणि वाईट घटना बघायला मिळतात. बदलापुरात तर शाळेतच चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याचं बघायला मिळालं आहे. याशिवाय अशा अनेक घटना सातत्याने समोर येत असतात. आता अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर येताना दिसत आहे. एका रोड रोमियोच्या त्रासामुळे पीडित महिला आणि तिचे कुटुंबिय दहशतीखाली असल्याची माहिती मिळत आहे. या रोड रोमियोला स्थानिक नागरिकांनी चोप दिला. तसेच पोलिसांच्या स्वाधीन देखील केलं. पण पोलिसांकडून अपेक्षित कारवाई न होता फक्त एनसी नोंदवून सोडवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर संबंधित रोड रोमियोच्या पुन्हा चकरा सुरु झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अंबरनाथमध्ये विवाहित महिलेचा पाठलाग करत छेड काढल्याने रोड रोमियोला स्थानिकांनी चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. मात्र यानंतर पोलिसांनी फक्त एनसी नोंदवून घेत या रोड रोमिओला सोडून दिलं आणि त्याचा आता पुन्हा त्रास सुरू झाल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने केली आहे. या प्रकरणी आता पोलिसांकडून काय भूमिका मांडली जाते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमकं काय घडलं?
अंबरनाथ पूर्वेच्या एका नगरात भागात पीडित महिला वास्तव्याला असून दररोज हा रोडरोमिओ तिला बघत उभा राहायचा. यानंतर हा रोडरोमिओ महिलेचा पाठलाग करत थेट तिच्या घरापर्यंत पोहोचल्याने महिलेचा पती आणि स्थानिकांनी त्याला चोप दिला आणि शिवाजीनगर पोलिसांच्या हवाली केलं. मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी फक्त एनसी नोंदवून घेत या रोडरोमिओला सोडून दिल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. यानंतर हा रोडरोमिओच्या पुन्हा तिथेच चकरा सुरू झाल्या असून यामुळे ही महिला आणि तिचं कुटुंब दहशतीच्या छायेत आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त होतेय.