भोपाळ : पती-पत्नीचं एक वेगळं नातं असतं. या नात्यात प्रेम, जिव्हाळा, समर्पण अशा अनेक गोष्टी असतात. या नात्यातील व्यक्ती वेळ प्रसंगी आपल्या जोडीदारासाठी स्वत:चा जीव देखील देऊ शकते, इतकं त्यांचं एकमेकांवर प्रेम असतं. पण मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या पतीचा निर्घृण खून केल्याची माहिती समोर आली आहे. या महिलेचं आपल्या दीरासोबत प्रेमसंबंध होते. पण तिचा पती तिला या प्रेमसंबंधांमध्ये अडथळा वाटत होता. त्यातून तिने आपल्या प्रियकर आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पतीची निर्घृणपणे हत्या केली.
विशेष म्हणजे आरोपी महिला एवढ्यावरच थांबली नाही. तिने मृतक पतीचं शीर धडापासून वेगळं केलं आणि घरामध्येच मृतदेह लपवला. जवळपास दीड वर्षांनी तिच्या या अमानुष कृत्याची माहिती उघड झालीय. या घटनेमुळे मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. एक महिला आपल्या पतीसोबत इतक्या निर्घृणपणे कसं वागू शकते? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.
संबंधित घटना ही रीवा जिल्ह्याच्या मऊगंज पोलीस ठाणे हद्दीतील उमरी गावात 2021 साली घडली होती. गावातील 40 वर्षीय रामसुशील पाल यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी रामसुशील यांचं दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं बिटोल उर्फ रंजना पाल असं आहे. लग्नानंतर दोन वर्षांनी रंजनाचं तिच्या दीरासोबत प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या या प्रेमसंबंधांची माहिती रंजनाच्या पतीला मिळाली तेव्हा त्याचा संतापाचा पारा चढला होता. या मुद्द्यावरुन त्यांच्यात वारंवार भांडणं व्हायला लागली होती.
रंजनाला आपला पती डोईजड होत असल्याचं वाटू लागल्याने तिने प्रियकर असलेल्या दीरासोबत एक खुनी प्लॅन आखला. तिने आपल्या पतीची हत्या करण्याचं ठरवलं. या पापात तिला तिच्या चुलत सासऱ्यानेदेखील साथ दिली. याशिवाय आणखी काही जणांनी साथ दिली. रामसुशीलची हत्या केली तर त्याच्या वाटेची संपत्ती देखील आपलीच होईल, असा विचार रंजना आणि तिच्या प्रियकराने केला होता. त्यामुळे त्यांनी रामसुशीलला मारण्याचा कट आखला.
रंजनाने आपल्या पतीला प्रेमाने समोसा खाऊ घालण्याचं नाटक केलं. तिने त्या समोश्यामध्ये उंदीर मारण्याचं औषध टाकलं होतं. रामसुशीलनने तो समोसा खालला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर रंजना आणि तिचा प्रियकर खूश झाले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी रामसुशीलचा मृतदेहाचं शीर धडापासून वेगळं केलं आणि घरातच मृतदेह लपवला.
या दरम्यान गेल्या दीड वर्षात मृतदेहाचे सर्व अवशेष नष्ट होण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे त्यांनी उरलेला मृतदेहाचा व्हिल्हेवाट लावण्याचं ठरवलं.त्यांनी विचार केला की आता मृतदेह पूर्णपणे खराब झाला आहे. त्यामुळे मृतदेह कुठेही जंगलात फेकून दिला तरी कुणाला समजणार आहे. त्यातूनच त्यांनी 25 ऑक्टोबरला भाटी येथील जंगलात मृतदेह फेकून दिला. त्यांनतर महिला उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर येथे निघून गेली.
या दरम्यान मध्य प्रदेश पोलिसांना भाटी येथील जंगलात मृतदेह आढळला. मृतदेहाची अवस्था पाहून तो मृतदेह नेमका कुणाचा आहे ते समजणं फार कठीण होतं. पण पोलिसांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात कोणी बेपत्ता झालंय का याची विचारपूस करायला सुरुवात केली. या दरम्यान काही गावकऱ्यांनी रामसुशीलचं नाव घेतलं. रामसुशील अनेक दिवसांपासून दिसला नाही. त्याची पत्नीही येथून काही दिवसांपूर्वी चालली गेलीय, असं गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं.
पोलिसांनी अधिक तपास केला आणि एक पथक महिलेचा शोधासाठी मिर्जापूरला पाठवलं. पोलिसांनी तिची विचारपूस केली असता तिने लगेच आपला गुन्हा कबूल केला. यावेळी तिने तिचा दीर, चुलत सासरा आणि इतर आरोपींची देखील नावं सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
पोलीस आणखी काही आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. पण संबंधित घटना उघड झाल्यानंतर रीवामधील नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.