मराठी कुटुंबाला मारहाण, शुक्लाचे दिवस फिरले, घरातील महत्त्वाची व्यक्तीही जेरबंद; काय घडलं?
कल्याणच्या योगीधाम अजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली आहे. मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला आणि त्याची पत्नी गीता शुक्ला यांच्यासह अन्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. चार आरोपी अद्याप फरार आहेत. या घटनेचा राजकीय पडसाद उमटला असून, चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अखिलेश शुक्लाच्या लाल दिव्याच्या गाडीचाही वापर या प्रकरणात समोर आला आहे.
कल्याणच्या योगीधाम अजमेरा सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचे चांगलेच पडसाद उमटले आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी या घटनेचा जोरदार निषेध नोंदवला आहे. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून आता पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. कालच आरोपी अखिलेश शुक्लाला अटक केली. त्यापाठोपाठ आज त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दोन जणांचा कसून शोध घेतला जात आहे.
मराठी कुटुंब मारहाण प्रकरण केल्या प्रकरणी अखिलेश शुक्लाची पत्नी गीता शुक्लासह दोघांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं. गीता हिला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून तिची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस या घटनेच्या मूळाशी जाऊन तपास करत आहेत. तसेच या मारहाण प्रकरणातील इतर आरोपींचाही कसून शोध घेतला जात आहे.
सहा ताब्यात, चार फरार
कालच पोलिसांनी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह सुमित जादव आणि दर्शन बोराडे या दोघांना अटक केली होती. मारहाण प्रकरणानंतर शुक्ला टिटवाळ्यात लपून बसला होता, तिथून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तर आज अखिलेश शुक्लाची पत्नी गीता शुक्लासह आणखी दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतलं असून चार आरोपींचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींना आज दुपारी कल्याण न्यायालयात देण्यात येणार असून आरोपीना एमसीआर की पीसी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लाल दिव्याच्या गाडीचा वापर
दरम्यान, शुक्लाच्या अटकेनंतर त्याची गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. स्थानिक नागरिक आणि पीडित कुटुंबाच्या तक्रारीनंतर शुक्लाची गाडी जप्त करून खडकपाडा पोलीस ठाण्यात आणली आहे. या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं आहे. तसेच गाडीवर लावण्यात येणारा लाल दिवाही सापडला आहे. मंत्रालयात आपण मोठा अधिकारी असल्याचं भासवत शुक्ला नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत असल्याची तक्रार आहे. तसेच त्याने लाल दिव्याची गाडी दाखवून कुणाची फसवणूक केलीय का? याची चौकशीही करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. लाल दिव्याची गाडी वापरल्या प्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.