नोकरीसाठी उत्तर प्रदेशातून खोपोलीत, सुट्टीच्या निमित्ताने मित्रांसोबत काशिद बीचवर, पोहण्यासाठी समुद्रात उतरला, तरुणाचा दुर्दैवी अंत
एक तरुण आपल्या मित्रांसोबत काशिद बीचवर फिरण्यासाठी आला होता. यावेळी तो पोहोण्यासाठी समुद्रात उतरला. पण पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे.
रायगड (मुरुड) : काशिद बीचवर आज (5 सप्टेंबर) विपरीत घटना घडली आहे. एक तरुण आपल्या मित्रांसोबत काशिद बीचवर फिरण्यासाठी आला होता. यावेळी तो पोहोण्यासाठी समुद्रात उतरला. पण पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
गौरव सिंग यादव असं 28 वर्षीय मृतक तरुणाचं नाव आहे. तो मुळचा उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर इथला रहिवासी होता. तो सध्या कामानिमित्ताने खोपोलीत राहत होता. दरम्यान, रविवारच्या सुट्टीच्या निमित्ताने तो मित्रांसोबत आज घराबाहेर पडला. काशिद बीचवर फिरण्यासाठी आला. तो पोहोण्यासाठी समुद्रात गेला. पण तिथून परत आलाच नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी अंत झाला.
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
गौरवच्या निधनाची बातमी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच गौरवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूची माहिती कुटुंबियांना देण्यात आली आहे. घरातला कर्ता तरुण मुलाच्या निधनाने कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
नागपुरच्या कन्हान नदीत पाच तरुण बुडाले
दरम्यान, नागपूर जिल्ह्यातही अशीच काहिशी घटना समोर आली आहे. कन्हान नदीत पोहायला गेलेले पाच युवक बुडाल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली आहे. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी यवतमाळहून एकूण दहा तरुण आले होते. दहा जणांपैकी पाच तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बुडालेल्या युवकांचा शोध घेण्याचे प्रयत्न कन्हान नदीपात्रात सुरु आहेत.
यवतमाळहून दहा मित्रांचा ग्रुप नागपूरला आला होता. हे तरुण 19 ते 21 वर्ष वयोगटातील होते. कामठी येथील अम्माचा दर्गा येथे सुरु असलेल्या ‘उर्स’मध्ये सहभागी होण्यासाठी ते आले होते. यावेळी कन्हान नदीपात्रात उचलून पोहण्याचा मोह काही जणांना झाला. मात्र पोहायला गेलेल्या पाच युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. सगळे युवक यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे असल्याची माहिती आहे.
बुडालेल्या तरुणांची नावे
1. सय्यद अरबाज, वय 21 वर्ष 2. ख्वाजा बेग, वय 19 वर्ष 3. सप्तहीन शेख, 20 वर्ष 4. अय्याज बेग. 22 वर्ष 5. मो. आखुजर, 21 वर्ष
बुलडाण्यात नदीपात्रात सेल्फीसाठी गेलेला तरुण बुडाला
दुसरीकडे, गेल्या महिन्यात बुलडाणा जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला होता. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली होती. या घटनेनंतर काही तासांनी अनिल सरोकार या तरुणाचा तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात मृतदेह आढळला होता
पालघरमध्येही तरुणाचा धरणात बुडून मृत्यू
पालघर जिल्ह्यातील एका 17 वर्षीय तरुणाचा गेल्या महिन्यात धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सफाळे जवळील रोडखड पाडा धरणात युवकाचा मृत्यू झाला. तन्मेष विकास तरे असं पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील एडवन येथील रहिवाशी होता. तन्मेष तरे हा काही मुला-मुलींसोबत फिरायला गेला होता. त्याच्यासोबत मुला-मुलींचा मोठा ग्रुप होता. यावेळी रोडखड धरणाजवळ आल्यानंतर हा ग्रुप मस्ती करत होता. यातच काही जण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. तन्मेष तरे हासुद्धा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरला.
संबंधित बातम्या :
नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत
नदीपात्रात सेल्फी घेणं महागात, तीन मित्र वाहून गेले, एकाला वाचवण्यात यश, दोघांचा पत्ताच नाही