Yusuf Memon Death | मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिक जेलमध्ये मृत्यू
1992-93 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा नाशिकच्या कारागृहात मृत्यू झाला.
नाशिक : 1992-93 च्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा (Yusuf Memon Death) नाशिकच्या कारागृहात मृत्यू झाला. तो 2018 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. हृदय विकाराच्या झटक्याने युसूफ मेमनचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. युसूफ मेमन हा टायगर मेमनचा भाऊ होता (Yusuf Memon Death).
1992-93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 800 जणांना मृत्यू झाला होता. तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. या भयावह बॉम्बस्फोटाचा सूत्रधार हा टायगर मेमन होता. मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तीशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचं अख्ख कुटुंब हे आरोपी होते.
मेमन कुटुंबातील आरोपी
- टायगर मेमन
- युसूफ मेमन
- रुबिना मेमन
- याकूब मेमन
- इसा मेमन
यापैकी टायगर मेमन अजूनही फरार आहे. तर याकूबला फाशी देण्यात आली आहे. इसा, रुबिना, युसूफ हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. यापैकी युसूफचा आज नाशिक जेलमध्ये हृदय विकाराने मृत्यू झाला आहे (Yusuf Memon Death).
12 मार्च 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट
मुंबई 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोटाने हादरली होती. 12 मार्चला 12 ठिकाणी झालेल्या या स्फोटांमध्ये तब्बल 257 जणांचा मृत्यू झाला होता, तर 713 जण जखमी होते. या बॉम्बस्फोटासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणलं होतं. त्यातील केवळ 10 टक्केच आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. त्या बॉम्बस्फोटात जीवितहानीप्रमाणे 27 कोटींची वित्तहानीही झाली होती.
या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा या स्फोटाचा मास्टरमाईंड आहे. तर आरोपींमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कय्यूम यांचा समावेश होता.
साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी आहेत. त्यांतील 100 आरोपींना आरोपांनुसार टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.
दोन वर्षांपूर्वी 7 सप्टेंबर 2017 रोजी विशेष टाडा कोर्टाने कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह त्याच्या साथीदारांना शिक्षा सुनावली. अबू सालेम आणि करिमुल्लाला जन्मठेप, ताहीर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली. तर रियाज सिद्दीकीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली (Yusuf Memon Death).
संबंधित बातम्या :