उत्तराखंड – पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून पक्षातील वाद चव्हाट्यावर आल्याचे आपण पाहतोय, तसेच बंड करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. उत्तरप्रदेशात भाजपला लागलेली गळती थांबवण्याचे आतोनात प्रयत्न केंद्रीय नेत्यांकडून करण्यात येत आहेत. पण आता उत्तराखंडमध्ये (UTTARAKHAND) नेत्यांच्या बंडाला सुरूवात झाली आहे. मंत्री हरकसिंग रावत (HARAKSINGH RAWAT) यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सरिता आर्य (SARITA AARY) यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये महिलांचा सहभाग अत्यंत कमी असल्याने सरिता आर्य नाराज होत्या. तसेच डेहराडूनमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सरिता आर्य यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून दिला.
दरम्यान, उत्तराखंड काँग्रेसकडून आज एक पत्रही जारी करण्यात आले आहे. यामध्ये सरिता आर्य यांची सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. सरिता आर्य यांच्या अशा वर्तुणुकीमुळे पक्षाची प्रतिमा रसातळाला गेल्याचे पत्रात स्पष्ट केले आहे.
मागच्या शनिवारीच सरिता आर्य यांनी काँग्रेसमध्ये असताना ‘मी मुलगी आहे, मी लढू शकते’ या प्रचारावर प्रश्न उपस्थित केला होता. या घोषणेपासून आम्हाला आशा आहे, असंही त्या त्यावेळी म्हणाल्या होत्या. तसेच होणा-या निवडणुकीत उत्तराखंड निवडणुकीत महिलांसाठी 20 टक्के तिकिटे राखीव ठेवण्याची आमची मागणी आहे, असंही वक्तव्य सरिता आर्य यांनी केलं होतं. पण त्यांना काँग्रेसने अधिक महत्त्व न दिल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा उत्तराखंडमध्ये आहे.
येत्या काळात आणखी किती उमेदवारांची बंड होतील, तसेच पक्षांतर होईल हे आपणास पाहावयास मिळणार आहे. तसेच किती लोकांना उमेदवारी मिळेल हेही महत्त्वाचे असेल. त्याचबरोबर उत्तराखंडमध्ये तिकीट न मिळालेल्या उमेदवाराला थांबण्यात किती पक्षांना यश मिळेल हेही पाहावयास मिळेल.