11th Admissions: पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेशास नकार, अकरावीच्या एकूण 2 लाख 44 हजार जागा रिक्त
कोटा प्रवेशासाठी अर्ज करण्याची मुदत आज संपणार
मुंबई: अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या (11th Online Entrance) आतापर्यंत दोन प्रवेश फेऱ्या झाल्या असून एकूण 1 लाख 27 हजार 92 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. मुंबई विभागात अकरावी प्रवेशासाठी 3 लाख 71 हजार 275 जागा उपलब्ध होत्या. आतापर्यंत झालेल्या प्रवेशानंतर 2 लाख 44 हजार 183 जागा रिक्त राहिल्या आहेत. उद्या, सोमवारी म्हणजेच 22 ऑगस्टला ऑनलाइन प्रवेशातील (Online Entrance) नियमित फेऱ्यांमधील शेवटची म्हणजेच तिसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीत प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थ्यांना विशेष फेरीवर अवलंबून रहावे लागणार आहे. इनहाऊस (Inhouse), अल्पसंख्याक आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश प्रक्रियादेखील सुरू असून कोटा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत 21 ऑगस्टला संपणार आहे.
विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात
तिसऱ्या गुणवत्ता यादीसाठी मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. त्याचबरोबर कोटा प्रवेशातही विद्यार्थ्यांना संधी असून एकूण रिक्त जागांपैकी इनहाऊस कोट्यातील 10 हजार 991, अल्पसंख्याक कोट्यातील 75 हजार 542, व्यवस्थापन कोट्यातील 14 हजार 72 जागा रिक्त आहेत. या जागांवरील प्रवेशासाठीदेखील विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
बोर्डनिहाय झालेले प्रवेश
बोर्ड | अर्ज केले | प्रवेश मिळाला |
---|---|---|
एसएससी | २,६७,६६८ | १,१३,२८५ |
सीबीएसई | ९६६९ | ४३७८ |
आयसीएसई | १२,७३५ | ७७२५ |
आयबी | १५ | १ |
आयजीसीएसई | १६३१ | ८६४ |
एनआयओएस | ३२२ | ८४ |
इतर | २०८४ | ७५५ |
प्रवेशासाठी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 42 हजारांच्या घरात
कॉलेज अलॉट होऊनही विद्यार्थ्यांनी प्रवेश कन्फर्म न केल्यामुळे रिक्त जागांची संख्या जास्त आहे. पसंतीचे कॉलेज न मिळाल्याने विद्यार्थी प्रवेश नाकारत आहेत, तर काही विद्यार्थी पहिल्या पसंतीचे कॉलेज अलॉट होऊनही प्रवेशाकडे पाठ फिरवत आहेत. आतापर्यंत कॉलेज अलॉट होऊनही प्रवेशासाठी संपर्क न साधणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 42 हजारांच्या घरात पोहोचली आहे.