11th Online Admission: अखेर मुहूर्त मिळाला! आत्ता पसंतीक्रम भरता येणार, गुणवत्ता यादी CBSE निकालानंतरच!
11th Online Admission: इतर बोर्डाचे निकाल लागलेले नव्हते त्यामुळे अकरावी प्रवेशाचा अर्ज क्रमांक दोन, पसंतीक्रमांक असणाऱ्या अर्जाला काय मुहूर्त लागत नव्हता. आता मात्र हा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.
मुंबई: महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (SSC Results 2022) लागून बरेच दिवस झालेत. विद्यार्थी आणि पालकवर्ग अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. खरं तर या वर्षी मॉक अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे निकाल लागेपर्यंत ते करता आलं. पण अकरावी प्रवेशासाठी जेव्हा अर्ज जाहीर झाले तेव्हा ते दोन भागात विभागले गेले होते. त्यातला पहिला भाग विद्यार्थ्यांनी भरला पण दुसऱ्या भागासाठी निकालाची प्रतीक्षा करावी लागणार होती. सीबीएसईचा निकाल (CBSE Results 2022), आणि इतर बोर्डाचे निकाल लागलेले नव्हते त्यामुळे अकरावी प्रवेशाचा (11th Online Admissions)अर्ज क्रमांक दोन, पसंतीक्रमांक असणाऱ्या अर्जाला काय मुहूर्त लागत नव्हता. आता मात्र हा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येणार आहे.
अखेर मुहूर्त मिळाला !
सीबीएसई दहावीच्या निकालामुळे रखडलेल्या अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या शुक्रवार, २२ जुलैपासून एसएससी, आयसीएसई, आयजीसीएसई आणि एनआयओएससह ज्या शिक्षण मंडळांचे दहावीचे निकाल जाहीर झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचा भाग २ म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहेत. गुणवत्ता यादी जाहीर करण्याची प्रक्रिया मात्र सीबीएसईच्या निकालानंतरच सुरू होणार आहे. राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी ही माहिती दिली.
भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येणार
मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर न झाल्याने या प्रवेशाला ब्रेक लागला होता. शिक्षण विभागाने सर्व बोर्डोंच्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू ठेवली असून सीबीएसई वगळता इतर बोर्डाचे विद्यार्थी अर्जाचा भाग 1 देखील भरत आहेत. आता 22 जुलैपासून ज्या विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग 1 पूर्ण भरला आहे अशा विद्यार्थ्यांना भाग 2 म्हणजेच कॉलेज पसंतीक्रम भरता येणार आहे. त्यासोबतच अल्पसंख्याक, इनहाऊस, व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशासाठीदेखील ऑनलाइन अप्लाय करता येणार आहे.
कोटा प्रवेशासाठी
- अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अप्लाय करावा.
- याद्वारे केवळ कॉलेज पसंती नोंदविण्याची प्रक्रिया सुरू राहील.
- कॉलेज पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज लॉक करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन प्रवेश महत्त्वाच्या गोष्टी
- विद्यार्थ्यांना पसंतीचे कॉलेज निवडून त्यांचे पसंतीक्रम ऑनलाइन नोंदविता येईल.
- किमान एक आणि कमाल 10 कॉलेजचे पसंतीक्रम नोंदवून अर्ज लॉक करणे आवश्यक आहे.
- नवीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी, अर्ज भाग 1 भरणे सुरू राहणार आहे.
- अर्जाचा भाग 1 व्हेरिफाय केलेले विद्यार्थीच भाग 2 भरू शकतात.
गुणवत्ता यादी सीबीएसईच्या निकालानंतर
अद्याप सीबीएसईचा निकाल जाहीर न झाल्याने अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज 1 भरलेल्या विद्यार्थ्यांना केवळ कॉलेज पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत. वेळापत्रक, गुणवत्ता याद्या, कॉलेज अलॉटमेंट याची सविस्तर माहिती सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच जाहीर होणार आहे. तसेच कोटा प्रवेशाची पुढील कार्यवाही सीबीएसईच्या निकालानंतरच होणार आहे.
- अकरावी प्रवेशाची वेबसाईट http://11thadmission.org.in
सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची प्रक्रिया निकालानंतरच सुरू करता येणार आहे. त्यासाठी त्यांना सुमारे पाच दिवसांपर्यंतचा वेळ दिला जाईल. त्यानंतरच प्रत्यक्ष प्रवेशफेरीला सुरुवात होईल. गुणवत्ता याद्यांचे सविस्तर वेळापत्रक यादरम्यान जाहीर होईल अशी माहिती माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिली.