CBSE Board Exams 2021-22: सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, टर्म -1 ची परीक्षा ‘या’ महिन्यात होणार!
सीबीएसई बोर्डाने (CBSE) एक मोठी घोषणा केली आहे. 16 सप्टेंबर 2021 रोजी सर्व शाळा आणि प्राचार्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीबीएसईने स्पष्ट केलं आहे की, सीबीएसई टर्म -1 बोर्ड परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे.
मुंबई : सीबीएसई बोर्डाने (CBSE) एक मोठी घोषणा केली आहे. 16 सप्टेंबर 2021 रोजी सर्व शाळा आणि प्राचार्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीबीएसईने स्पष्ट केलं आहे की, सीबीएसई टर्म -1 बोर्ड परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे बोर्डाने सर्व शाळा आणि प्राचार्यांना परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यासाठी देखील सांगितले आहे. (CBSE Board Exams 2021-22: CBSE Board Term-1 Exam to be held in November, December 2021-22)
CBSE बोर्ड परीक्षा 2021-22 नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2021 मध्ये होणार आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांची चांगलीच धाकधुक वाढली आहे. सध्या कोरोना काळात आॅनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. तसेच परीक्षा देखील आॅनलाईन पध्दतीने घेतल्या जात आहेत. मात्र, कोरोनामुळे अनेक वेळा परीक्षाच घेतल्या जात नव्हत्या. मात्र, आता अचानकपणे सीबीएसई बोर्डाने टर्म -1 परीक्षा होणार असल्याचे घोषित केले आहे.
सीबीएसईने जाहीर केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार शाळांना 16 ऑगस्ट 2021 पासून एलओसी काढण्याचे निर्देश देण्यात आले होते. यासाठी 17 सप्टेंबर 2021 पासून डेटा संकलन सुरू केले जाणार आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वरून ई-परीक्षा लिंकवर प्रवेश करून शाळेंना एलओसी मिळणार आहेत. सीबीएसई बोर्डाने दिलेल्या सुचनेनुसार शाळांना डेटा योग्य आणि वेळेवर बोर्डाकडे सादर करायचा आहे.
बोर्डाच्या सुचनेनुसार शैक्षणिक संस्थांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की विद्यार्थी इतर कोणत्याही मंडळाकडे नोंदणीकृत नाही. शाळांनी केवळ त्यांच्या विद्यार्थ्यांची यादी पाठवावी. तसेच विद्यार्थ्यांनी नियमितपणे वर्गांना हजेरी लावली पाहिजे. सीबीएसईशी संलग्न शाळा आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांना अधिक तपशीलांसाठी सीबीएसईने जारी केलेली तपशीलवार अधिसूचना वाचण्याचा सल्ला दिला गेला आहे.
सीबीएसई बोर्डाने टर्म -1 च्या परीक्षेची घोषणा केल्यामुळे आता विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागावे लागणार आहे. कारण टर्म -1 ची परीक्षा होणार किंवा नाही याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रम निर्माण होता. मात्र, विद्यार्थ्यांचे आॅनलाईन क्लासेस सुरू होते. टर्म -1 ची परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होणार असल्यामुळे शाळांना देखील विद्यार्थ्यांचा सर्व डेटा बोर्डाकडे पाठवायचा आहे. त्यामुळे आता शाळा प्रशासन आणि विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.