दहावी, बारावीची परीक्षा यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात झाली. विद्यार्थी आता निकालाची वाट पाहत आहेत. दहावी, बारावीच्या निकालासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु मे महिन्यात निकाल येण्याची शक्यता आहे.
मागील वर्षी सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला होता. यंदा लोकसभा निवडणूक होत असल्याने दहावी आणि बारावीचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, असा दबाव मंडळावर आहे. यंदा निकालात सीबीएसई बोर्डाने एक महत्वाचा बदल केला आहे. हा निकाल बोर्डाची वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु प्रथमच डिजिलॉकर अॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर मिळणार आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे आहे.
सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी हायस्कूल बोर्डाच्या (दहावी) परीक्षेसाठी तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट बोर्डाच्या (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. हे सर्व विद्यार्थी आता निकाल लागण्याची वाट पाहत आहेत.