‘शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी’, सांगलीत गरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षणाचा अनोखा प्रयोग
कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना आली खरी पण ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत. ती खेड्या-पाड्यातील गरिबांची लेकरं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत.
सांगली : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण ही संकल्पना आली खरी पण ज्यांच्याकडे मोबाईल नाहीत. ती खेड्या-पाड्यातील गरिबांची लेकरं ऑनलाइन शिक्षण घेऊ शकत नाहीत. परिणामी त्यांच्या शिक्षणाच आबाळ होत आहे. त्यामुळे ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. हीच समस्या लक्षात घेत सांगलीच्या कुंडलमधील क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांच्या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कुलमधील 35 हून अधिक शिक्षकानी ‘शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी’ या मोहिमेची सुरुवात केली आहे. ऑनलाइन शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना घरी जाऊन शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे (Education initiative of education at door of student in Sangli amid Corona).
कुंडलमधील या गांधी एज्युकेशन सोसायटीच्या प्रतिनिधी हायस्कुलमध्ये 5 वी ते 10 वी इयतेत साधारण 1300 विद्यार्थी आहेत. पण कोरोनाच्या निर्बंधामुळे बराच काळ शाळा बंद राहिल्यात. त्यामुळे या हायस्कुलच्या प्रांगणात फक्त शिक्षकांचीच लगबग दिसून येते. या हायस्कुलमधील 1300 पैकी 700-800 विद्यार्थी हे ऑनलाइन क्लासला हजर राहतात. उर्वरित 200-300 विद्यार्थी हे केवळ घरात मोबाइल नसल्याने ऑनलाइन क्लासला बसू शकत नव्हती.
35 शिक्षकांच्या मदतीने ‘शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी’ उपक्रम
यामुळे या 200-300 विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार, हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातील काय अशी भीती शिक्षकांना सतावत होती. त्यात ही सारी मुलं गरीब, शेतकरी, मजूर कुटुंबातील. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेने काही दिवसांपासून आपल्या 35 शिक्षकांच्या मदतीने ‘शिक्षणाची वारी, विद्यार्थ्यांच्या दारी’ हा उपक्रम हाती घेतला, अशी माहिती प्रतिनिधी हायस्कुलचे मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव यांनी दिली.
मंदिरातच 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा
हा उपक्रम राबवायला सुरुवात करण्याअगोदर शिक्षकांनी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बनवली.यामध्ये 5 ते 8 मधील काही गावातीलच विद्यार्थी होते. तर काही विद्यार्थी हे वाडी-वस्तीवर मजुर कुटूंबातील होते. गावातील विद्यार्थ्यांच्या साठी मग मंदिराची जागा निवडली गेली. मंदिरातच 5 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा भरली. 35 शिक्षकाची टीम मधील एक एक शिक्षक वेळापत्रक आखून यातील सर्व विद्यार्थ्यांना शिकवू लागले.
केवळ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावा हा उद्देश
दुसरी जागा निवडली गेली ती वाडी-वस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी. वाडी-वस्तीवर शिक्षक जाऊन पत्र्याच्या घराच्या शेड भोवती जी जागा मोकळी दिसेल तिथे झाडाखाली जे विद्यार्थी गोळा होतील त्याच्यासाठी शिक्षक शिकवू लागले. कधी कविता, कधी कथा तर कधी मोठ्याने वाचन करायला सांगत. या वाडी-वस्तीवरची मुले शिक्षणापासून दूर जाऊ नयेत यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. अशा उघड्यावरच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांचा फार काही अभ्यास होईल अशी शिक्षकाना फार अपेक्षा नाही. केवळ विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात राहावा, त्याच्या कानावर शिक्षकाचे चार शब्द पडावेत हीच भावना आहे, असं मत शिक्षक प्रशांत आवटी यांनी व्यक्त केलं.
दिवसातील 2-3तास तरी मंदिरात किंवा वाडी-वस्तीवर एकत्र येत शिक्षक शिकवत असल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित असलेल्या या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. मागील दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने मागील वर्षीचा अभ्यासक्रमाची मुलाना उजळणी करून देण्याचा प्रयत्न होत आहे.
हेही वाचा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं चूक सुधारली, बी.कॉमचे 11 हजार विद्यार्थी उत्तीर्ण
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडं शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी, कोरोनाच्या सावटातून शिक्षण क्षेत्राला बाहेर काढण्याचं आव्हान
JEE Main 2021 : जेईई परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा
व्हिडीओ पाहा :
Education initiative of education at door of student in Sangli amid Corona