Delhi School | देशातली पहिली व्हर्चुअल शाळा सुरु, गल्लीत रहा, दिल्लीचं शिका… केजरीवालांच्या नव्या शाळेतल्या सुविधा काय?
Delhi Virtual School | सुरुवातीच्या टप्प्यात इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत व्हर्चुअल क्लास सुरु केले जातील. यासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरु झाली आहे. विशेष म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेऊ शकतात.
नवी दिल्लीः दिल्लीतल्या शैक्षणिक धोरणाचा संपूर्ण देशात, जगात गाजावाजा होतो. याच दिल्लीतून आता एक अशी शाळा सुरु झाली आहे, ज्यात कुणीही अॅडमिशन (Admission) घेऊ शकतो. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांनी पहिल्या व्हर्चुअल शाळेची (Virtual School) सुरुवात केली आहे. देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात राहून तुम्ही या शाळेत शिकू शकता. सुरुवातीच्या टप्प्यात ईयत्ता 9वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग या शाळेत सुरु करण्यात येतील. यासाठीची प्रवेश प्रक्रिया आजपासूनच सुरु झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत यासंबंधीची घोषणा केली. व्हर्चुअल स्कूल दिल्ली बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनद्वारे या शाळेला मान्यता मिळेल. या शाळेतून JEE-NEET साठीचे विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केलाय.
अरविंद केजरीवाल काय म्हणाले?
कोरोना काळात अनेक शाळांनी व्हर्चुअल वर्ग चालवले. त्यातूनच या शाळा सुरु करण्याची प्रेरणा मिळाल्याचं अरविंद केजरीवाल यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षपणे शाळेत गेले पाहिजे, मात्र काहीजण शाळेत पोहोचू शकत नाही. अशा मुलांचे बालपण हिरावले जाते. अशा विद्यार्थ्यांसाठीच ही शाळा सुरु करण्यात आल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.
Today, we are starting India’s first virtual school-Delhi Model Virtual School, affiliated with the Delhi Board of School Education. We’re inviting admission applications for Class 9 from today. Students from all over the country can apply for admission: Delhi CM Arvind Kejriwal pic.twitter.com/yrwWD9Z9aD
— ANI (@ANI) August 31, 2022
शाळेच्या सुविधा काय?
- संपूर्ण देशभरातून कोठूनही या शाळेत प्रवेश घेता येईल.
- व्हर्चुअल शाळेत प्रवेशासाठी www.DMVS.ac.in या वेबसाइटवर अर्ज करता येईल.
- सुरुवातीला 9वी ते 12 वी चे वर्ग सुरु केले जातील.
- आठवी पास झालेले विद्यार्थी या शाळेत प्रवेश घेऊ शकतात.
- शाळेचे नाव दिल्ली मॉडल व्हर्चुअल स्कूल असे आहे.
- या शाळेत शिक्षणाव्यतिरिक्त इतर स्पर्धा परीक्षांची तयारीही करून घेतली जाईल.
- या शाळेत प्रत्यक्ष शिक्षणाची सोय नसेल.
- सर्व इयत्तांचे वर्ग फक्त ऑनलाइन असतील.
- ऑनलाइन वर्गांचे रेकॉर्डिंग केले जाईल. विद्यार्थी त्यांच्या वेळेनुसार रेकॉर्डेड क्लासही पाहू शकतील.
- या ऑनलाइन शाळेत एक डिजिटल लायब्ररी असेल.
- मुलांना कोणत्याही व्हर्चुअल क्लासमध्ये जॉइन करण्याची परवानगी असेल.
- शाळेतील कोर्स, प्रवेश प्रक्रिया तसेच वर्गांची माहिती लवकरच अॅडमिशनच्या पोर्टलवर दिली जाईल, असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.