Global Study Hub: UGC चा जबरदस्त प्लॅन, भारत बनणार अभ्यासाचं जागतिक केंद्र!
'भारतीय उच्च शिक्षण संस्था परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश पात्रतेच्या समकक्षतेच्या आधारावर प्रवेश देऊ शकतात. समतुल्यता निश्चित करण्याचा निर्णय युजीसी किंवा यूजीसीने अशा हेतूंसाठी मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेद्वारे किंवा संबंधित नियामक मंडळाद्वारे घेतला जाईल.
नवी दिल्ली : देशातील विद्यापीठे (University) आणि उच्च शिक्षण संस्थांमधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परदेशी विद्यार्थ्यांना आता 25 टक्के अतिरिक्त जागा वाढविण्याची परवानगी देण्यात येणार आहे. परदेशी विद्यार्थ्यांना भारतात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागणार नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ही माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात भारतातील पदवी (Degree) आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या आंतरराष्ट्रीयीकरणाबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती यूजीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली. अतिरिक्त जागा वाढविण्यास एकूण आसन क्षमतेव्यतिरिक्त मान्यता देण्यात येणार असून या जागांबाबतचा निर्णय संबंधित उच्च शिक्षण संस्था (एचईआय) पायाभूत सुविधा, शिक्षक व इतर गरजा व विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन घेईल. यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले, ‘भारतीय उच्च शिक्षण संस्था परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश पात्रतेच्या समकक्षतेच्या आधारावर प्रवेश देऊ शकतात. समतुल्यता निश्चित करण्याचा निर्णय युजीसी किंवा यूजीसीने अशा हेतूंसाठी मान्यता दिलेल्या कोणत्याही संस्थेद्वारे किंवा संबंधित नियामक मंडळाद्वारे घेतला जाईल.
या आधारावर वाढणार जागा
जगदीश कुमार म्हणाले की, उच्च शिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पारदर्शक प्रवेश प्रक्रियेचा अवलंब करू शकतात. कुमार म्हणाले, “उच्च शिक्षण संस्था त्यांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मंजूर केलेल्या एकूण आसन क्षमतेच्या 25 टक्के अतिरिक्त जागा निर्माण करू शकतात. उच्च शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधा, शिक्षकांची संख्या आणि इतर गरजा आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे लक्षात घेऊन २५ टक्के अतिरिक्त जागा निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जागा फक्त आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असतील
आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त आसनामध्ये विविध संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या देवाणघेवाणीत किंवा भारत सरकार आणि इतर देश यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा समावेश नसेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की या जागा केवळ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी असतील. या अतिरिक्त प्रवर्गाची जागा रिक्त राहिल्यास ती अन्य कोणत्याही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणार नाहीत ती फक्त ज्यांच्याकडे विदेशी पासपोर्ट आहेत त्यांनाच देण्यात येतील.
कोरोना महामारीच्या आधीच्या काळात ही संख्या अधिक
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सन 2021 मध्ये एकूण 23,439 परदेशी विद्यार्थी भारतात आले होते. मात्र कोरोना महामारीच्या आधीच्या काळात ही संख्या अधिक होती. 2019 मध्ये 75 हजार परदेशी विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतात आले होते.