इन्फोसिसच्या सूधा मूर्ती तयार करणार शाळेचा अभ्यासक्रम, NCERT सोपविली मोठी जबाबदारी
केंद्र सरकार साल 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके आणण्याची तयारी करीत आहेत.
नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांची पत्नी आणि प्रख्यात लेखिका सुधा मूर्ती यांची अनेक पुस्तके बेस्ट सेलर आहेत. त्यांच्यावर आता सरकारने एक महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात सुधारणा करुन त्यात आवश्यक बदल करण्यासाठी स्थापन केलेल्या NCERT समितीत सुधा मूर्ती यांचा समावेश केला आहे. त्यामुळे आता एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात सूधा मूर्ती यांची छाप असणार आहे.
सुधा मूर्ती यांची एनसीईआरटीच्या पॅनलवर निवड झाली असतानाच सोबतच या समितीत पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष विवेक देबरॉय ,सल्लागार समिती सदस्य संजीव सन्याल, आरएसएस विचारवंत चामू कृष्ण शास्री आणि गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचाही समावेश करण्यात आला आहे. एनसीईआरटी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी 19 सदस्यीय राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि शिक्षण सामग्री समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि प्रशासन संस्थानचे चान्सलर महेश चंद्र पंत यांची निवड झाली आहे.
ही समिती देशातील शालेय शिक्षणासाठी सिलॅबस आणि पाठ्यपुस्तक डेव्हलपर्ससाठी रोडमॅप तयार करेल. केंद्र सरकार साल 2024-25 या शैक्षणिक सत्रापासून नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके आणण्याची तयारी करीत आहेत. ही जबाबदारी सरकारने या समितीवर सोपविली आहे. इयत्ता 3 ते 12 साठीच्या शालेय अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक सामग्री तयार करण्याची काम ही समिती करणार आहे.
कोण आहेत सुधा मूर्ती
सूधा मूर्ती या टाटाच्या टेल्को कंपनीत रुजू होणाऱ्या पहिल्या महिला इंजिनियर असून त्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. त्या प्रसिद्ध लेखिका असून सामाजिक कार्यकर्त्या देखील आहेत. त्या आपली मते बेधडक पणे मांडत असतात. त्यांच्या प्रेरणादायी भाषणांना खूपच पसंद केले जाते. त्यांच्या कामामुळे त्यांना सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले आहे. त्यांचे जावई ऋृषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान आहेत.