ITI Admissions: ITIची डिमांड वाढली! दहावीत 100 टक्के मिळवलेले 53 विद्यार्थी आयटीआयमध्ये
यंदा एकूण 3 लाख 8 हजार 439 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. यात 2 लाख 67 हजार 235 मुले, तर 41 हजार 198 मुली आणि 6 ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत.
मुंबई: दहावीत 100 टक्के गुण मिळालेल्या 53 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले असून यात 47 मुले तर 6 मुली आहेत. यंदा 6 ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी देखील दहावीनंतर आयटीआय अभ्यासक्रमाकडे (ITI Syllabus) वळण्याचा निर्णय घेतला आहे. आयटीआय अभ्यासक्रमाकडे वळणाऱ्यांमध्ये मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर केली. या यादीनुसार गुणवंत विद्यार्थ्यांचा (Scholar Students) ओढा आयटीआयकडे असल्याचे दिसून आले. यंदा एकूण 3 लाख 8 हजार 439 विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. यात 2 लाख 67 हजार 235 मुले, तर 41 हजार 198 मुली आणि 6 ट्रान्सजेंडर विद्यार्थी आहेत. अंतिम गुणवत्ता यादी देखील जाहीर झाली असून उद्या 29 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर होणार आहे. यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी 30 जुलै रोजी सकाळी वाजल्यापासून 3 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेशासाठी (ITI Entrance) मुदत देण्यात आली आहे.
दुसरी प्रवेश फेरी
- दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्यासाठी 30 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 6 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादी जाहीर होणार असून या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी 8 ते 12 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
- 1 सप्टेंबरपासून राज्यातील आयटीआय अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. राज्यातील सर्व आयटीआय प्रशिक्षण केंद्र 1 सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने केल्या आहेत.
राज्यातील आयटीआय प्रवेशाची स्थिती
आयटीआयचे प्रकार आयटीआयची संख्या एकूण जागा
- सरकारी आयटीआय – 419 / एकूण जागा – 93,904
- खासगी आयटीआय – 553 / एकूण जागा- 55,364
- एकूण आयटीआय – 972 / एकूण जागा- 1,49,268
स्थानिक स्तरावर सुद्धा रोजगार उपलब्ध
राज्यातील आयटीआयमध्ये पारंपरिक शाखेच्या अभ्यासक्रमांसोबतच नावीन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहेत. गेल्या तीन वर्षात आयटी, कम्प्युटर, एअररोनॉटिक्स, रोबोटिक्स अशा विषयांना धरून अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पुढे चांगली रोजगाराची संधी मिळते. आयटीआयच्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर सुद्धा रोजगार उपलब्ध आहेत. अकरावी आणि इंजिनिअरिंगला प्रवेश न घेणारे विद्यार्थी ठरवून आयटीआयला प्रवेश घेतात. यंदा सरकारी आणि खासगी आयटीआयमध्ये मिळून एक लाख 49 हजार 268 जागांवर प्रवेशप्रक्रिया होईल.