Maharashtra SSC Result 2021 | नागपूरचा निकाल सर्वात कमी असूनही 99.84%, काय आहेत दहावीच्या निकालाची वैशिष्ट्यं
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84 %) आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02 % ने जास्त आहे.
Maharashtra SSC Result 2021 LIVE Updates पुणे : राज्यातील दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 99. 95 टक्के लागला असून कोकण विभागाचा निकाल पैकीच्या पैकी म्हणजेच 100 टक्के लागला. मुलांचा निकाल 99.94 टक्के, तर मुलींचा निकाल 99.96 टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल उपलब्ध आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना http://result.mh-ssc.ac.in, http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
निकालाची वैशिष्ट्ये
• या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15,75,806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15,75,752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली. त्यापैकी 15,74,994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे.
• या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 82,802 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 82,674 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 74,618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 90.25 आहे.
• सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84 %) आहे.
• सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 % आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02 % ने जास्त आहे.
• दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84 % लागला आहे.
• एकूण 72 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपद्धतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100% टक्के लागला आहे.
• राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6,48,683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत 6,98,885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 2,18,070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत आहेत.
• राज्यातील 22,767 शाळांतून 16,58,614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22,384 शाळांचा निकाल 100% लागला आहे.
• 2021 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2020 च्या निकालाच्या तुलनेत 4.65% जास्त आहे.
• खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28,424 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 97.45 आहे.
परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 2021 (दहावी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीतील तरतुदीनुसार इयत्ता नववीचा अंतिम निकाल, दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन आणि दहावीचे अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळांमार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे.
कोविड19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळांना तोंडी / प्रात्यक्षिक / अंतर्गत मूल्यमापन इ. परीक्षा घेणे शक्य व्हावे यासाठी मंडळामार्फत विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या. या सूचना विचारात घेऊन शाळा स्तरावर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 2021 (दहावी) परीक्षेला भाषेसाठी 20 गुणांची तोंडी परीक्षा, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या विषयाची 20 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा व सामाजिक शास्त्रे आणि गणित या विषयांसाठी प्रत्येकी 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा घेण्यात आलेली आहे.
स्वविकास व कलारसास्वाद, आरोग्य आणि शारीरिक शिक्षण तसेच संरक्षणशास्त्र / स्काऊट / गाईड / नागरी संरक्षण / वाहतूक सुरक्षा / एन.सी.सी. या विषयांची परीक्षा शालेय स्तरावर विशेष मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आयोजित करण्यात आल्याय या विषयांबाबत शाळांकडून प्राप्त झालेली श्रेणी गुणपत्रिकेमध्ये नोंदवण्यात आली आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2016 पासून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्यामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमातील विषयांचा समावेश अनिवार्य विषय गटात भाषा / सामाजिक शास्त्रे या विषयास पर्याय म्हणून करण्यात आलेला असून या विषयाची 70 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा शालेय स्तरावर विशेष मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आयोजित करण्यात आली. परीक्षेस बदललेल्या अभ्यासक्रमानुसार एकूण 10 व्यावसायिक विषयांचा (X1 to X8, 95, 97 ) व जुन्या अभ्यासक्रमानुसार एकूण 14 व्यावसायिक विषयांचा (81 to 94) समावेश होता.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा 2021 साठी एकूण 72 विषयांसाठी मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी, गुजराती, कन्नड, सिंधी (अरेबिक किंवा देवनागरी) आणि तेलुगू या आठ माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती.
संबंधित बातम्या :
ना परीक्षा, ना टेन्शन, तरीही विद्यार्थी नापास, दहावीच्या नापास विद्यार्थ्यांचा आकडा किती?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी सीट नंबर कसा मिळवायचा? वाचा सोप्या टिप्स
यंदा तर रेकॉर्डच मोडला ब्वा पोरांनी…, तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 टक्के!