Mumbai University | मुंबई विद्यापीठाची परीक्षा! व्हॉट्सॲपवर मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक?
आता हेच बघा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात येण्याआधीच उत्तरपत्रिका हातात होती. परीक्षा द्यायच्या आधीच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर उत्तरपत्रिका होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली, याप्रकरणी तपास सुरु आहे.
मुंबई: पेपरफुटी प्रकरण याबाबत आपण नेहमी ऐकतो. आता तर इंटरनेटमुळे सगळ्या गोष्टी सहज शक्य होतात किंवा विद्यार्थी सुद्धा तितकेच हुशार झालेत असं म्हणायला हरकत नाही. प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका फुटू नयेत यासाठी शाळा, कॉलेज, विद्यापीठे खूप काळजी घेतात. पण तरीही विद्यार्थी सुद्धा आता काही कमी नाहीत. काळ बदलला तसे आता विद्यार्थीसुद्धा अपग्रेड झालेत. ते आता इंटरनेटची मदत घेतात. आता हेच बघा मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात येण्याआधीच उत्तरपत्रिका हातात होती. परीक्षा द्यायच्या आधीच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲपवर उत्तरपत्रिका होती. हा प्रकार उघडकीस आल्यावर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली, याप्रकरणी तपास सुरु आहे.
ऑब्जेक्टिव्हचे उत्तरं
मुंबई विद्यापीठात टी.वाय.बी.कॉम (सत्र-५) ची हिवाळी सत्राची परीक्षा सुरुये. मुंबईच्या फोर्टमधील सिद्धार्थ कॉलेजमध्ये परीक्षेपूर्वीच उत्तरपत्रिका व्हॉट्सॲपवर आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सिद्धार्थ कॉलेजमध्ये ३१ ऑक्टोबरला कॉमर्स-५ या विषयाचा पेपर सुरु होता. दरम्यान इथे एका वर्गात जे पर्यवेक्षक होते त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला. परीक्षेदरम्यान एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्सॲपमध्ये त्यांनी कॉमर्स-५ या विषयाची प्रश्नपत्रिका आणि त्यातील ऑब्जेक्टिव्हचे उत्तरं पाहिले. त्यांना हा प्रकार लक्षात आला.
विद्यापीठ काय म्हणतं…
यावर “पेपर फुटलेला नाही, एकाच विद्यार्थ्याच्या व्हॉट्सॲपवर पेपर आल्याचे आढळून आले आहे.” असं विद्यापीठाकडून सांगण्यात आलंय. आरोपी गिरगाव येथील भवन्स कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याला त्याच्या मित्राने, सहआरोपीने सकाळी व्हॉट्स ॲपद्वारे ही प्रश्नपत्रिका पाठविली होती. याबाबत फोर्ट येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्सच्या सहाय्यक प्राध्यापक सुमेध जगन्नाथ माने यांच्या तक्रारीनुसार फसवणुकीसह महाराष्ट्र विद्यापीठ मंडळाच्या व इतर परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या सगळ्या प्रकारामध्ये पैशाचे व्यवहार होते का? किती जणांचा यात सहभाग आहे? याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत.