NEET-UG च्या निकालात मोठा ट्विस्ट, टॉपरची संख्या घटली; लाखो परीक्षार्थींना रँकिंगचा फटका; नेमकं काय घडलं?
अखेर एकदाचा NEET-UG चा निकाल लागला आहे. मेरीट लिस्ट आणि रँकिंगही जारी करण्यात आली आहे. यापूर्वी 4 जून रोजी NEET-UG चा निकाल लागला होता. पण त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयात प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने हा निकाल जारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा निकाल लावण्यात आला आहे.
वादाच्या भोवऱ्या अडकलेल्या नीट-यूजी2024चा निकाल लागला आहे. नीट-यूजीसीची मेरिट लिस्टही जाहीर झाली आहे. या नव्या मेरिट लिस्टमध्ये टॉपरची संख्या प्रचंड प्रमाणात घटली आहे. नव्या लिस्टमध्ये फक्त 17 परीक्षार्थीच मेरीटमध्ये आले आहेत. या आधी 61 जण टॉपर होते. आता या 17 परीक्षार्थींना शंभर टक्के म्हणजे 720 पैकी 720 मार्क मिळाले आहेत. तसेच तब्बल 4 लाख परीक्षार्थींची रँकींगही बदलली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला एकूण 24 लाख विद्यार्थी बसले होते.
या 17 टॉपर (99.9992714 टक्के) च्या यादीत दिल्लीत राहणाऱ्या मृदुल मान्या आनंदने पहिला नंबर पटकावला आहे. या फायनल मेरिट लिस्टमध्ये राजस्थानच्या विद्यार्थ्यांचा दबदबा पाहायला मिळत आहे. राजस्थानातील चार विद्यार्थ्यांनी टॉप 17मध्ये जागा मिळवली आहे. या 17 टॉपरमध्ये दिल्लीतील दोन, उत्तर प्रदेशातील दोन, बिहार, पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि चंदीगडच्या प्रत्येकी एका परीक्षार्थीचा समावेश आहे. तर महाराष्ट्राच्या तिघांचा समावेश आहे. म्हणजे महाराष्ट्राने सर्वाधिक टॉपर देण्याचा मान पटकावला आहे.
कट ऑफमध्ये दोन अंकाची घसरण
फायनल मेरिट लिस्टच्यानंतर मिनिमम क्वॉलिफाइंग कटऑफही पडली आहे. आधी खुल्यावर्गासाठी ही 164 होती. आता ती दोन अंकाने कमी होऊन 162 झाली आहे. ओबीसींसाठी 163 होती. ती आता 161 झाली आहे. एससी एसटी वर्गासाठी 129 वरून 127 झाली आहे. परीक्षेत सहभागी झालेले विद्यार्थी एनटीएची वेबसाइट exams.nta.ac.in/NEET वर जाऊन मेरिट लिस्ट आणि टॉपर्सची यादी पाहू शकतात.
कौन्सिलिंग कधी सुरू होणार?
मेडिकल लिस्ट जारी झाल्यानंतर आता नॅशनल मेडिकल कौन्सिलकडून कौन्सिलिंग शेड्यूल जारी केलं जाणार आहे. यशस्वी परीक्षार्थींना एमबीबएस, बीडीएससह अन्य मेडिकल कोर्सला प्रवेश घेण्यासाठी या कौन्सिलिंगच्या प्रक्रियेतून जावं लागणार आहे. परीक्षेत मिळालेल्या रँकच्या आधारे सीट दिली जाणार आहे. या कौन्सिलिंगचे चार राऊंड असणार आहेत.
कोर्टात सुनावणी
दरम्यान, 4 जून रोजी यूजीसी नीटचा निकाल लागला होता. त्यात अनेक मुले टॉपला आली होती. मात्र नीटचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. ही परीक्षा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. कोर्टात प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर कोर्टाने निकाल जारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज यूजीसी नीटचा निकाल लागला आहे.