दहावी, बारावीचा निकाल अडचणीत, ६३ हजार शिक्षकांचे ‘बहिष्कार अस्त्र’
SSC and HSC Result : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेनंतर पालक आणि विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा असते. परंतु पालकांसाठी चिंता निर्माण करणारी बातमी आहे. पेपर तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे.
भूषण पाटील, कोल्हापूर | दि. 6 मार्च 2024 : दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. या महिन्यात दोन्ही परीक्षा संपणार आहे. परंतु परीक्षा सुरु असतानाच पालकांसाठी चिंता निर्माण करणारी बातमी आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे त्याचा परिणाम निकालावर होणार आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून बहिष्काराचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी निर्णय मागे घेतला. आता विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या समिती ६३ हजार शिक्षक आहेत.
शिक्षकांचा का पेपर तपासणीवर बहिष्कार
शासन शाळांना देत असलेल्या अनुदानाचा टप्पा वाढवत नाही. त्यामुळे विनाअनुदानित शाळा कृती समितीने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळच्या सचिवांना दिल्याचे संघटनेचे नेते खंडेराव जगदाळे यांनी सांगितले. जोपर्यंत अनुदानाबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत बहिष्कार कायम ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला.
मुख्याध्यापकांनी पेपर देऊ नये
विनाअनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले की, दहावी, बारावीचे पेपर तपासणीसाठी मुख्याध्यापकांनी स्विकारु नये. हे पेपर घेतले गेले असतील तर मुख्याध्यापकांनी शिक्षकांना पेपर देऊ नये. बोर्डाकडून दबाब आल्यास शिक्षकांनी संघटनेशी संपर्क साधावा. पेपर तपासणीवर 63 हजार शिक्षकांचा बहिष्कार असणार आहे. त्यामुळे यंदा दहावी, बारावीचे निकाल लांबण्याची भीती आहे.
यामुळे बहिष्कार घेतला होता मागे
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून बारावीची परीक्षा सुरु होताच बहिष्कार सुरु केला होता. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेतील मुख्य नियामकांच्या बैठक होत नव्हत्या. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांसोबत संघटनेशी चर्चा झाली. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संघटनेने बहिष्कार मागे घेतला होता. परंतु आता विनाअनुदानित शाळा कृती समिती बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.