ST Strike: एसटीच्या संपामुळे गुरुजींनाही उशीर, दुप्पट पैसे देऊनही शाळेत पोहोचता येईना, विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल…
राज्य शासनात विलीनीकरणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरु आहे. यामुळे सर्वच प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र, या संपाचा फटका विशेष करून ग्रामीण भागातील लोक, विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक यांना बसला आहे.
मुंबई : राज्य शासनात विलीनीकरणासाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप (ST Strike) सुरु आहे. यामुळे सर्वच प्रवाशांचे हाल होत आहेत. मात्र, या संपाचा फटका विशेष करून ग्रामीण भागातील लोक, विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक यांना बसला आहे. राज्य सरकार व प्रशासनाच्या नवीन नियमावलीनुसार सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत.
एसटीअभावी शालेय विद्यार्थ्यांचे हाल
राज्यात एसटीअभावी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. विलिनीकरणाच्या मागणीसाठी सुरु असलेला संपाचा तिढा अद्यापही सुटू शकलेला नाही. त्यामुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून त्यांना खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे. 55 हजार चालक, वाहक अद्यापही संपावर असून संपाचा तिढा सुटू शकलेला नाही.
ग्रामीण भागात चौथी, पाचवी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी काही विद्यार्थ्यांना जवळच्या गावात किंवा तालुक्यातील शाळेत जावे लागते. यात एसटी नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी रिक्षा, खासगी चारचाकी प्रवासी वाहने किंवा टेम्पो ट्रॅव्हलरचा पर्याय पालकांना निवडावा लागत आहे. यासाठी अवाच्या सव्वा रक्कम आकारली जात असल्याने पालकांना नाईलाजाने खिसा रिकामा करावा लागत आहे.
शाळेत वेळेवर पोहचण्यासाठी शिक्षकांची तारेवरची कसरत
इगतपुरी तालुक्यातही 15 डिसेंबरपासून इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले आहेत. तब्बल दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी शाळेत पोहोचत असले तर सार्वजनिक वाहतुकीमुळे शिक्षकांना शाळा गाठायला अडथळा येत आहे. इगतपुरी रेल्वे स्थानकावर गाड्यांना थांबा देऊन मासिक पास सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कोरोना काळात बहुतेक शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने 15 डिसेंबरपासून प्रत्यक्ष शाळा झाल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. असे असले तरीही शिक्षकांना नाशिकहून इगतपुरी तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज यावे लागते. संपामुळे बससेवा बंद तसेच रेल्वेचे थांबे देखील बंद असल्याने शिक्षकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एक तासाच्या प्रवासाला तब्बल दोन-अडीच तास लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
संबंधित बातम्या :
MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का?; अनिल परब म्हणतात…
Ashish Shelar : मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी सरकारने आत्मचिंतन करावे, शेलारांचा टोला