12th Student : हे यश मोठंय! बारावीत 94.5% काढणारा हा मुलगा खास आहे कारण..
निमिषनं सेरेब्रल पाल्सी असूनही बारावीच्या परीक्षेत तब्बल 94.5 टक्के गुण मिळवले आहेत.
मुंबई : जिद्द आणि चिकाटी असली की कोणतंही मोठं ध्येय साध्य करता येतं. याचे अनेक उदाहरणं देखील आपण समाजात पाहत असतो. पण, अनेकदा शारिरीक व्याधींमुळे समाजातील काही मुलं खचून जातात. मात्र, रडत बसण्यापेक्षा का काही नवीनं करू नये, असा प्रश्न त्यातील काहींना पडतो आणि मग ते भविष्यात यशोशिखर गाठल्याचं आपल्या कानावर पडतं. असंच एक उदाहरण अलीकडे बारावीच्या (HSC) निकालातून समोर आलं आहे. सेरेब्रल पाल्सी (Cerebellar palsy) असलेल्या पोदार कॉलेज ऑफ कॉमर्सचा विद्यार्थी निमिष देशमुख याला बारावीच्या परीक्षेत 94.5 टक्के गुण मिळाले आहेत. आपल्या शारिरीक व्याधीवर (physical ailments) रडत न बसता निमिषने ऑनलाइन क्लासेसचा फायदा करून घेतला. त्याने अभ्यासात ऑनलाईन क्लासेसचा फायदा करून घेतल्यानं त्याला मोठं यश संपादन करण्यात आणखीनच मदत झाली आहे. निमिषच्या चांगल्या कामगिरीचा निश्चय त्याची शारीरीक व्याधी रोखू शकली नाही. कारण, तो संपूर्ण शैक्षणिक वर्ष त्याच्या तयारीत व्यस्त राहिला. याच निमिषनं बारावीच्या परीक्षेत तब्बल 94.5 टक्के गुण मिळवले आहेत.
निमिषची आई कांचन देशमुख यांनी एक वेबसाईटला सांगितलं की, ‘ निमिषला कॉमर्सची आवड आहे. तो या विषयांचा मोठ्या आवडीनं अभ्यास करतो. तो नेहमीच खूप मेहनती आणि प्रामाणिक विद्यार्थी राहिला आहे. त्याने त्याच्या मित्रांना मदत करण्यासाठी देखील प्रयत्न केले आहेत. त्याच्या सर्व शंकांचं निरसन त्याच्या शिक्षकांनी वेळोवेळी केलं. विशेष म्हणजे त्यांच्यात एक चांगला आणि परिपूर्ण संवाद झाला. त्याचा परिपाक म्हणून निमिषचं हे यश म्हणता येईल. मी त्याच्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि त्याला दिलेल्या पाठबळाचे आभार मानते, असं त्याच्या आईनं म्हटलंय.
निमिष देशमुख हा कुर्ल्यात राहतो. निमिष त्याच्या कुटुंबासह, त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या शिक्षकांना देतो. ऑनलाइन ते ऑफलाइन क्लासेसचा प्रवास हा खूप सोपा केल्याबद्दल निमिष हा त्याच्या शिक्षकांचे आभार मानतो. निमिष हा त्याच्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. निमिषने लहानपणी मोठ्या प्रमाणात फिजिओथेरपी घेतली आहे. आता तो नियमितपणे व्यायाम करतो. तो त्याच्या शारिरीक स्थितीचा एक घटक म्हणून स्विकार करतोय. तो सकारात्मक विचार ठेऊन पुढे जातो आहे. भविष्यात निमिषला सीए बनायचं आहे.
सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय?
सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. यामुळे मुलांची शारीरिक क्रियाशक्ती आणि चलने-फिरण्याची क्षमता कमी होते. सेरेब्रल शब्दाचा अर्थ डोक्याचे दोन्ही भाग असा होतो. पाल्सी शब्दाचा अर्थ शारीरिक क्रियाशक्तीमधील दुर्बलता, असा होतो. यामध्ये मुलांना वस्तू पकडण्यात आणि चालण्यात अडचणी येतात.