मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून (Higher and Technical Education) इन्फोसिस (Infosys) सोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे. इन्फोसिस सोबत सामंजस्य करार केल्यानं राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या 40 लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना इन्फोसिसच्या मदतीनं कौशल्य आधारित अभ्यासक्रमांचं (Skill Based Courses) शिक्षण घेता येणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसीस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. pic.twitter.com/XNG7xjzGOt
— Uday Samant (@samant_uday) November 30, 2021
महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणू महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.
या करारामुळं 40 लाख विद्यार्थ्यांना आणि 1 लाख प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. कौशल्य आधारित आणि तांत्रिक शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत देण्यात येणार असल्यानं राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही. इन्फोसिस या कंपनीने विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले आहेत. या कोर्सेसचा विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
इन्फोसिसनं तयार केलेले अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना निःशुल्क आणि औपचारिक (formal) अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत.
पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेसचं शिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे.
तंत्रशिक्षण संचालनालया अंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालया अंतर्गत 3 हजार महाविद्यालयातील 30 लाख विद्यार्थ्यांना अशा एकूण 40 लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे.
इतर बातम्या:
विद्यापीठात ॲडमिशन घ्यायचंय, 2022-23 पासून प्रवेश परीक्षा द्यावी लागणार, यूजीसीचं विद्यापीठांना पत्र
Uday Samant said Maharashtra Higher and Technical Education Department sign mou with Infosys 40 students will be get benefit