चीनच्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेण्याचा विचार करताय, UGC नं विद्यार्थ्यांना दिलेला इशारा नक्की वाचा
चीनमध्ये (China) शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) एक सावधानतेचा इशारा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या माहितीनुसार चीनमधील काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नोटिफिकेशन जारी केली आहेत.
नवी दिल्ली: चीनमध्ये (China) शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) एक सावधानतेचा इशारा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेल्या माहितीनुसार चीनमधील काही विद्यापीठांनी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नोटिफिकेशन जारी केली आहेत. सध्या सुरु असणारे अभ्यासक्रम आणि आगामी काळात सुरु होणार अभ्यासक्रमाबाबत प्रवेशाचं नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. मात्र, चीनच्या सरकारनं कोरोना विषाणू ससंर्गामुळं नोव्हेंबर 2020 पासून व्हिसा रद्द केलेला आहे. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी, असं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. भारतात ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करण्यात आलेल्या पदवीला मान्यता नसल्याचं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे. यानंतर यूजीसीचे चेअरमन जगदेश कुमार (Jagadesh Kumar) यांनी देखील यासंदर्भात माहिती दिली आहे.
A few Universities in China have started issuing notices for admn to various degree programs for current & upcoming academic yrs.Any prospective student needs to be aware that Chinese Govt imposed strict travel restrictions in wake of COVID&suspended all visas since Nov 2020: UGC pic.twitter.com/0Cme7LgOAa
— ANI (@ANI) March 25, 2022
यूजीसीचं विद्यार्थ्यांना नेमकं आवाहन काय?
मोठ्या संख्येनं विद्यार्थी चीनला परत जाऊ शकलेले नाहीत. चीननं लादलेल्या निर्बंधामुळं विद्यार्थ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. चीनच्या प्रशासनानं हे अभ्यासक्रम ऑनलाईन पद्धतीद्वारे पूर्ण केलं जाणार असल्याचं कळवलंय. मात्र, यूजीसी आणि एआयसीटीईच्या प्रचलित नियमांनुसार कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय ऑनलाईन पद्धतीनं पूर्ण करण्यात आलेल्या पदवीला मान्यता दिली जाणार नाही. विद्यार्थ्यांनी ही बाब लक्षात घ्यावी, असं यूजीसीकडून कळवण्यात आलं आहे.
विद्यार्थ्यांनी सतर्कता बाळगावी
चीन कडून लादण्यात आलेले निर्बंध लक्षात घेता भारतीय विद्यार्थ्यांनी चीनच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी नियमावली लक्षात घ्यावी, असं देखील यूजीसीकडून कळवण्यात आलं आहे. यूजीसीचे चेअरमन जगदेश कुमार यांनी देखील विद्यार्थ्यांना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं आहे.