UGC: CBSE 12वीचा निकाल लागण्याआधीच विद्यापीठांकडून प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर! युजीसीचं विद्यापीठांना पत्रं
CBSE 12th Results: महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी येत आहेत आणि सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेशाची अडचण येत आहे कारण काही विद्यापीठांनी प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित केलेली आहे.
सीबीएसई दहावी (CBSE 10th Result) आणि बारावी (CBSE 12th Result) दोन्हीचा निकाल येणं अजून बाकी आहेत. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी बारावीचा निकाल लागून बरेच दिवस झालेले आहेत. सीबीएसईच्या निकाल लवकर न लावल्याने विद्यार्थी पालक सगळ्यांचाच गोंधळ उडाला आहे आणि हा गोंधळ फक्त महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा नाही तर सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचाही उडालाय. अडचण दोन्हींना आहे, महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी येत आहेत आणि सीबीएसई च्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेशाची अडचण येत आहे कारण काही विद्यापीठांनी प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित केलेली आहे. त्यामुळे यूजीसीने (UGC) सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना सीबीएसईने इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर त्यांच्या पदवी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे.
विद्यापीठांनी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे
सीबीएसई 12 वीचा निकाल जाहीर झाल्यानंतरच विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांना पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अंतिम मुदत निश्चित करण्यास सांगितले आहे, अशी माहिती अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली. सीबीएसईने अद्याप बारावीचा निकाल जाहीर केला नसला तरी काही विद्यापीठांनी आपली प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे, असे नमूद करून कुमार म्हणाले की, बोर्डाने निकाल जाहीर करण्यापूर्वी विद्यापीठांनी अंतिम तारीख निश्चित केली तर सीबीएसईचे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतील. ते म्हणाले, “यूजीसीने सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना सीबीएसईने इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर त्यांच्या पदवी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख निश्चित करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून अशा विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुरेसा वेळ मिळेल,” ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागेल- UGC
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) गेल्या आठवड्यात आयोगाशी संपर्क साधल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले असून विद्यापीठांना त्यांच्या निकालानुसार त्यांचे प्रवेशाचे वेळापत्रक निश्चित करण्यास सांगावे, अशी विनंती केली आहे. ‘काही विद्यापीठांनी 2022- 23 या सत्रासाठी पदवीपूर्व अभ्यासक्रमांमध्ये नोंदणी सुरू केल्याचे निदर्शनास आले आहे. या परिस्थितीत सीबीएसई निकाल जाहीर होण्यापूर्वी विद्यापीठांनी अंतिम तारीख निश्चित केल्यास सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागेल’ असे यूजीसीने कुलगुरूंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
UGC requests all the higher educational institutions to fix the last date of their under graduate admission process after declaration of result of class Xll by CBSE so as to provide sufficient time to such students for admission in under graduate courses. pic.twitter.com/HZFfPpEquu
— Mamidala Jagadesh Kumar (@mamidala90) July 13, 2022
त्यामुळे अशा उमेदवारांना पुरेसा वेळ देण्यासाठी सीबीएसईचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उच्च शिक्षण संस्थांनी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित करावी, अशी विनंती करण्यात आली आहे,’ असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेचा निकाल महिनाअखेरपर्यंत जाहीर करण्याची शक्यता आहे. कोविड-19 महामारीमुळे यंदा बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक लांबणीवर पडले होते या कारणामुळे निकालही लांबणीवर पडलाय.