UGC NET Exam 2021: यूजीसी नेट परीक्षा अर्ज दुरुस्ती सुविधा सुरु, चूक दुरुस्त करण्यासाठी एनटीएकडून संधी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा 2021 साठी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मधील अर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली आहे.
नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यूजीसी नेट परीक्षा 2021 साठी डिसेंबर 2020 आणि जून 2021 मधील अर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करुन दिली आहे. एनटीए यूजीसी नेट परीक्षेच्या वेबसाईटवर अर्जात सुधरणा करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुविधा 7 सप्टेंबर 2021 रोजी सुरु करण्यात आली असून 12 सप्टेंबर 2021 पर्यंत सुरु राहील. जे उमेदवार अर्जामध्ये बदल करू इच्छितात ते UGC NET च्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर भेट देऊन दुरुस्ती करू शकतात.
अर्ज सुधारणा सुविधा सशुल्क
अर्जात सुधारणा करण्याची सुविधा 12 सप्टेंबर, 2021 रोजी बंद होईल. विहित मुदत संपल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत एनटीएकडून कडून सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही. अर्जामध्ये सुधारणा करू इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना क्रेडिट/डेबिट कार्ड/नेट बँकिंग/यूपीआय किंवा पेटीएम वॉलेटद्वारे ऑनलाइन दुरुस्तीसाठी अतिरिक्त शुल्क भरणे आवश्यक आहे.अर्जात सुधारणा करण्याची सुविधा केवळ त्या उमेदवारांना उपलब्ध आहे ज्यांनी 6 सप्टेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी आवश्यक शुल्कासह अर्ज यशस्वीरीत्या सादर केला आहे. एनटीएने ही केवळ एक वेळची सुविधा दिली असल्याने, उमेदवारांनी सुधारणा करताना सावधगिरी बाळगली पाहिजे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
यूजीसी नेट 2021 अर्जात दुरुस्ती कशी करावी
स्टेप 1: सर्वप्रथम ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. स्टेप 2: आता तुमचा अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप 3: तुमचा अर्ज फॉर्म स्क्रीनवर दिसेल. स्टेप 4: आता त्यात तुम्हाला जी सुधारणा करायची आहे ती करा. स्टेप 5: आता फॉर्म सबमिट करा.
नेट परीक्षा वेळापत्रकात बदल
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षेचे आयोजन 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान करण्यात येणार होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संदर्भातील नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. बदललेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा 6 ते 8 ऑक्टोबर आणि 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. परीक्षा दोन सत्रांमध्ये आयोजित केली जाणार असून सकाळी 9 ते 12 या काळात एका बॅचचे पेपर होतील तर दुसऱ्या बॅचचे पेपर दुपारी 3 ते 6 या दरम्यान होतील,अशी माहिती एनटीएकडून देण्यात आली आहे.
परीक्षेच्या तारखा का बदलण्यात आल्या?
10 ऑक्टोबरला इतर परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. काही विद्यार्थ्यांनी ही बाब एनटीएच्या लक्षात आणून दिली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं यानंतर यूजीसी नेट परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.
कोरोनामुळं परीक्षा लांबणीवर
देशभरातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी पात्रता परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट परीक्षा साधारणपणे वर्षातून दोन वेळा आयोजित केली जाते. जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये परीक्षेचे आयोजन केलं जातं. मात्र यावर्षी कोरोनामुळे डिसेंबरमध्ये परीक्षा आयोजित करण्यात आली नव्हती. नेट परीक्षा मे महिन्यामध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 2 ते 17 मे दरम्यान ही परीक्षा होणार होती. मात्र, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे ही परीक्षा घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ती परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली होती.
इतर बातम्या:
NET Exam 2021: एनटीएकडून नेट परीक्षेच्या तारखांमध्ये बदल, नवं वेळापत्रक जाहीर
UGC NET 2021 Exam: JRF च्या वयोमर्यादेसंदर्भात मोठा निर्णय, NTA कडून नोटिफिकेशन जारी
UGC NET Exam 2021 Correction window active for December and June cycle