मुंबई : ‘Everyone has a story’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. प्रत्येत व्यक्तीचं काहीतरी स्वप्न आहे. प्रत्येकाचं एक विशिष्ट असं जग आहे, आणि त्या जगामध्ये संघर्ष आहे. हा संघर्ष प्रत्येकाच्या वाट्याला येतो. कित्येकांच्या नशिबात तर तो पाचवीलाच पुजलेला असतो. मात्र, काही संयमी आणि जिद्दी माणसं सर्व आव्हानं, सर्व परीक्षा, पराभव गिळत पुढे चालत राहतात. आणि एकेदिवशी त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते स्वत:ला सिद्ध करुन दाखवतात. ते जिंकतात. संपूर्ण जग त्यांच्यासमोर नतमस्तक होतं. अशाच एका यशस्वी व्यक्तीमत्त्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे व्यक्तीमहत्त्व म्हणजे 26 वर्षांची रुची बिंदल! (UPSC success story of IAS topper Ruchi Bindal)
रुचीने पाचव्यांदा मजल मारली
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचं यूपीएससी परीक्षा पास होऊन आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचं स्वप्न असतं. अधिकारी झाल्यानंतर समाजात प्रतिष्ठा तर मिळतेच त्यासोबत समाजासाठी काम करण्याची संधी मिळते. मात्र, अधिकारी होण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. प्रचंड ज्ञान प्राप्त करावं लागतं. शेकडो पुस्तकं वाचावे लागतात. वारंवार परीक्षा देऊन पराभव स्वीकारायचा असतो. बऱ्याचदा परीक्षेत नापास झाल्यामुळे काही विद्यार्थी नैराश्यात जातात. काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा नांद सोडून देतात. मात्र, काही विद्यार्थी अपयश हीच यशाची पहिली पायरी मानत आणखी जोमाने कामाला लागतात. रुची बिंदल हीने देखील तेच करुन दाखवलं. स्पर्धा परीक्षांमध्ये चार वेळा अपयश पत्कारल्यानंतर रुचीने पाचव्यांदा मोठी मजल मारली. पाचव्यांदा रुचीने एवढी मोठी मजल मारली की ती 2019 मध्ये देशात यूपीएससीची टॉपर (39 वा नंबर) ठरली.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांना रुचीच्या काही टीप्स
रुचि बिंदल संघर्षानंतर अधिकारी बनली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावं यासाठी रुची तिचा अनुभव, संघर्ष आणि काही टीप्स देते. तिच्या सूचना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याला आंधळपणाने फॉलो न करता, आपल्या क्षमतेनुसार यूपीएससीच्या पूर्व परीक्षा किंवा मेन्ससाठी तयारी करावी, असा सल्ला रुची विद्यार्थ्यांना देते.
विद्यार्थ्यांनी यूपीएससीची पूर्व परीक्षा कशी द्यावी?
यूपीएससीच्या पूर्व परीक्षेत जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करावा. सर्वात आधी ज्या प्रश्नांची उत्तरे माहिती आहेत ती लिहावेत. नंतर ज्या प्रश्नांबाबत साशंकता आहे त्या प्रश्नांना सोडवावे, असा सल्ला रुची देते. पण त्यासाठी सर्वच प्रश्न डोळ्याखाली गेलेले असायला हवेत. त्याबाबत वाचलेलं असायला हवं, असंही ती म्हणते.
यूपीएससीची मेन्स परीक्षा कशी द्यावी?
यूपीएससी मेन्सच्या परीक्षेसाठी लिमिमटेड सोर्स ठेवून वारंवार त्याचं वाचन करावं. एकदा वाचून झाल्यानंतर वारंवार त्याची मॉक टेस्ट करावी. मेन्ससाठी मॉक टेस्ट महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. विद्यार्थी जितका लिहिण्याचा सराव करतील तितका त्यांचा चांगला अभ्यास होईल, असं रुचीचं म्हणणं आहे (UPSC success story of IAS topper Ruchi Bindal).
हेही वाचा : ताईला बघून म्हणाली, मी सुद्धा पोलीस होणार, मग ठरलं, शेतकऱ्याच्या सहा लेकी पोलीस दलात!