HSC Exam : बारावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच बारावीच्या (इयत्ता 12 वी) परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 12 नोव्हेंबरपासून परीक्षेचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. बारावीच्या विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
वर्षा गायकवाड यांचं ट्विट
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या इ.१२वी च्या परीक्षांसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्रे १२ नोव्हेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने https://t.co/KX9sqYrmnj येथे घेतले जातील. तपशील खालीलप्रमाणे pic.twitter.com/Yhq5MJ26sn
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) November 11, 2021
नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचं आवाहन
परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायचे आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी वेगळ्या तारखा जाहीर
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्ज 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. तर, उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरावयाचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे.
उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री लिस्ट मंगळवार 28 डिसेंबर 2021 रोजी जमा करावयाची आहे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी कळवलं आहे.
इतर बातम्या:
चांगली बातमी: औरंगाबादेत जायकडवाडीत उभारणार तरंगता सौर प्रकल्प, मंत्री भागवत कराड यांची माहिती
Varsha Gaikwad declared HSC exam 2022 application form submission schedule appeal students to apply online