मुंबई : सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे राजकीय आखाडा गाजत आहे. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार, असा नारा शरद पवार यांनी दिलाय. तर उत्तर प्रदेश (up elections 2022) गोव्यात परिवर्तन होणार, शिवसेना 50 जागा लढणार अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay ruat) यांनी दिली आहे. यांच्या याच वक्तव्यांनंतर, भाजप प्रदेशाध्यक्षांच्या निशाण्यावर पवार आणि ठाकरे आलेत. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीशी हातमिळवणी करुन लढणार अशी घोषणा करताच, यूपीत परिवर्तन होणार, असा दावा शरद पवारांनीही (Sharad pawar) केला आणि संजय राऊतांनीही भाजपला डिवचलं. त्यानंतर जळजळीत ट्विट करुन चंद्रकांत पाटलांनी पवार पंतप्रधान कधी होणार ? आणि उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडणार? असा सवाल केला. सध्या निवडणुका जरी बाहेरील राज्यात होत असल्या तरी त्यावरून राज्यातल्या नेत्यांमध्ये जोरदार वार-पलटवार सुरू असल्याचे दिसून येत आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमधील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
चंद्रकांत पाटलांचे ट्विट काय?
ज्योतिष्य, कर्मकांड नाकरणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेते कधी झाले ?. उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो. पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे. या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवार साहेबांनी करावी. असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय आखाडा तापला आहे.
उद्घव ठाकरेंच्या टीकेवर राऊतांनी, चंद्रकांत पाटलांना उत्तर दिलं. तर पवारांवरुन मलिकांसह राऊतांनीही चंद्रकांत पाटलांवर पलटवार केला. पवार देशात सत्ता परिवर्तनासाठी आहेत, असा खोचक टोला मलिकांनी लगावला आहे. पवारांऐवढी उंची गाठा, टेकड्यांना सह्याद्रीची उंची कळणार नाही, असा टोला राऊतांनीही लगावला. त्यानंतर राऊत कोणाचे प्रवक्ते आहात ? हे माहितीच आहे असं टीकास्त्र फडणवीसांनीही सोडलं. चंद्रकांत पाटील कायम उद्धव ठाकरेंच्या मंत्रालयातील अनुपस्थितीवरुन निशाणा साधत आहेत. दोन दिवसांआधीच चंद्रकांत पाटलांनी ठाकरेंना डिवचलं होतं. महाविकास आघाडीचा विरोधक जसा भाजप आहे. तसं भाजपचा सामना महाविकास आघाडीशीच आहे. त्यामुळं जेव्हाही पवार किंवा शिवसेनेचे नेते भाजपवर टीकेची संधी साधतात. तेव्हा पलटवार करण्यासाठी चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून आघाडीवर असतात.