Goa Assembly Election 2022 : बिगुल वाजलं! गोव्यात आचारसंहिता लागू, ‘व्हॅलेन्टाईन डे’ला मतदान, निकाल कधी?
गोव्यात एकूण 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपनं सुरुवातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. मनोहर पर्रीकरांनंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी आता खरा कसोटीचा काळ सुरु झाला आहे.
पणजी : अखेर गोव्यातील राजकीय वातावरण आता आणखी तापणार आहे. गेल्या काही दिवसांपासूनच गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला होता. अशातच आता गोव्यातला निवडणुकांपर्यंतचा प्रत्येक दिवस हा हायव्होल्टेज ड्राम्याचा असेल, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. याला कारण आहे, ते म्हणजे अखेर गोव्याच्या 2022 साठीच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. हा कार्यक्रम जाहीर होताच गोव्यात आचारसंहिताही लागू झाली आहे.
व्हॅलेन्टाईन डे ला मतदान
गोव्यात या वर्षी व्हॅलेन्टाईन डेला म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे. गोव्याच्या निवडणुका या एकाच टप्प्यात पार पडणार आहे. तर 10 मार्च रोजी गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. गोव्यातील यंदाही होणारी निवडणूक ही भाजपची मनोहर पर्रीकरांच्या निधानानंतरची पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्याचप्रमाणे अनेक पक्षांनी गोव्यात इन्ट्री करत भाजपला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीर रंगतदार चुरस पाहायला मिळणार हे नक्की.
आधी आप, मग तृणमूलची इन्ट्री
गोव्यात आधी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं गेल्या वर्षभरापासून गोव्यात कंबर कसली आहे. तर दुसरीकडे अगदी निवडणुकीच्या तोंडवर तृणमूल काँग्रेस पक्षानंही गोव्यात दंड थोपटले आहेत. तृणमूल काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षासोबत युती केली आहे. तर दुसरीकडे गोवा फॉरवर्डने काँग्रेससोबत युती केली आहे. अशातच आता भाजप समोरीलही आव्हानं वाढली आहे. दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे नेहमीप्रमाणेच यंदाही गोव्यातील निवडणूक ही रंगतदार स्थितीत आली आहे. त्यामुळे गोव्यात सत्ता राखणं हे भाजपसाठी वाटतं तितकं सोप्प नसणार आहे.
सावंत पुन्हा मुख्यमंत्री होतील?
गोव्यात एकूण 40 विधानसभा मतदारसंघ आहेत. भाजपनं सुरुवातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं होतं. मनोहर पर्रीकरांनंतर मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्यासाठी आता खरा कसोटीचा काळ सुरु झाला आहे. 2022 मध्ये 22 जागा जिंकण्याचं ध्येय भाजपनं डोळ्यांसमोर ठेवलंय. दरम्यान, राजकीय नेत्यांची या पक्षातून त्या पक्षात जाण्याची परंपरा यंदाही गोव्यात सुरुच असल्याचं पाहायला मिळालंय. अशात नेमकं गोव्यातील मतदार कुणाच्या पारड्यात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मतदान करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Interacted with BJP Mandal Prabharis in the presence of Union Minister Shri @kishanreddybjp and @BJP4Goa President Shri @ShetSadanand and other leaders in view of 2022 Assembly Polls in Goa. pic.twitter.com/ezfj7ssuCv
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) January 8, 2022
शिवसेनेकडून महाविकास आघाडीचासाठी प्रयत्न?
दरम्यान, नुकतेच संजय राऊत हे गोव्यात गेले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांच्या गोवा गाठीभेटी वाढल्या आहेत. त्यातच गोव्यात महाराष्ट्राप्रमाणे महाविकास आघाडासारखा प्रयोग करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळत आहेत. या सगळ्यात शिवसेनेचं गोव्यात फारसं प्राबल्य नसलं, तरिही शिवसेना नेमकी 2022च्या निवडणुकीत काय भूमिका वठवते, याकडे महाराष्ट्राची नजर लागली आहे.
कोविडचं संकट
दरम्यान, ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यापैकी सगळ्यात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणार राज्य हे गोवा आहे. गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्क्यांपेक्षाही जास्त असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय. अशातच गोव्यात जोरदार कॅम्पेनिंग सुरु केलेल्या राजकीय पक्षांना आता डिजिटल प्रचारावरच जास्त भर द्यावा लागणार आहे. 15 जानेवारीपर्यंत प्रचारसभा, सर्व प्रकारच्या रॅली यावर बंदी घालण्यात आल्यानं आता गोव्यातील राजकीय नेते आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी कसरत करतात, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर बातम्या –
शिवसेनाचा साधा सरपंचही नाही गोव्यात, या प्रमोद सावंतांच्या वक्तव्याला राऊतांचं प्रत्युत्तर!
5 State Elections 2022: जाणून घ्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे दहा मुद्दे
Goa Assembly Election 2022 : गोवा, उत्तर प्रदेशात शिवसेना दंड थोपटणार? संजय राऊतांचा मोठा दावा