Goa Assembly Election 2022 : फडणवीस ज्यांच्या घरी गेले, त्या मायकल लोबोंनी भाजप सोडली! सपत्नीक काँग्रेसमध्ये
Goa Politics : मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो या उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होत्या. अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला भाजपकडू तिकीट मिळावं, यासाठी लोबोंचे प्रयत्न सुरु होते, असंही सांगितलं जातं.
कळंगुट : कळंगुट (Calangute) हा गोव्यातील महत्त्वाच मतदारसंघ. गेल्या अनेक दिवसांपासून कळंगुट मतदारसंघाचील राजकारण रंगात आलेलं आहे. अशातच सोमवारी मायकल लोबो यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली असून अखेर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह त्यांची पत्नी डिलायला लोबो यादेखील काँग्रेस पक्षात आल्या आहेत. भाजपला सातत्यानं घरचा आहेर देण्याच्या नेत्यांपैकी मायकल लोबो (Michael Lobo) हे एक होते. त्यांनी गेल्या वर्षभरात अनेकदा भाजपला घरचा आहेर देत भाजपच्या मंत्रिमंडळातील नेत्यांशी पंगा घेतला होता. भाजप सरकारमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक प्रभूपाऊसकर तसंच मॉविन गुदिन्हो यांच्यासोबत मायकल लोबो यांचे खटके उडाल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अशातच आता ऐक निवडणुकीचा कार्यक्रम जवळ आलेला असताना त्यांनी भाजपला राम-राम केलाय. सपत्नीक मायकल लोबो हे काँग्रेसमध्ये (Goa Congress) दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांनीही त्यांचं जंगी स्वागत केलं आहे. पर्यटनाच्या दृष्टीनं प्रसिद्ध असलेला हा मतदारसंघ गोव्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असून उत्तर गोव्यातील या मतदारसंघात मायकल लोबो यांनी नेहमीच आपलं वर्चस्व राखलं आहे. त्यांच्या काँग्रेसप्रवेशामुळे आता गोव्यातील राजकारण अधिकच रंगतदार स्थितीत आलं आहे.
After a lot of reasoning and contemplation, I have submitted my resignation as a MLA & Minister. The way ahead from here will be a well thought decision in the favor of the welfare of Bardez and with the support of our people. pic.twitter.com/UEzcrlvaIX
— Michael Lobo (@MichaelLobo76) January 10, 2022
फडणवीस गेले होतो लोबोंच्या घरी
दरम्यान, गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नेमणूक झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मायकल लोबो यांच्या कळंगुटमधील घरी गेले होते. त्यांच्या घरी जाऊन फडणवीसांनी मायकल लोबोंची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण चर्चा झाली नसेल, अशी शक्यता कमीच आहे. अत्यंत आक्रमक झालेल्या मायकल लोबो यांना थंड करण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून झाले असावेत, असे तर्क त्यावेळी राजकीय जाणकारांनी वर्तवले होते. दरम्यान, आता निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्यानंतर अखेर मायकल लोबो यांनी कमळाला टाटा-बायबाय केलंय. काँग्रेसचा हात तर त्यांनी हातात घेतला आहेच. शिवाय आपल्या पत्नीलाही काँग्रेसमध्ये सोबत घेतलं. यामागेही महत्त्वाचं कारण आहे.
LIVE: Induction of Ex- Minister Michael Lobo into Congress Party https://t.co/a8YtH50OE5
— Goa Congress (@INCGoa) January 11, 2022
शिवोलीत लोबोंची पत्नी लढणार?
मायकल लोबो यांची पत्नी डिलायला लोबो या उत्तर गोव्यातील शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होत्या. अनेक दिवसांपासून आपल्या पत्नीला भाजपकडू तिकीट मिळावं, यासाठी लोबोंचे प्रयत्न सुरु होते, असंही सांगितलं जातं. दरम्यानच्या काळात मायकल लोबो यांनी अमित शाह यांची भेटही घेतली होती. दिल्लीतही त्यांनी वरीष्ठ नेत्यांसोबत आपल्या मागण्यांबाबत चर्चा केल्यानं गोव्यातील खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे. अशातच आता काँग्रेसकडून आपल्या मनोकामना पूर्ण होतील, या इराद्यानं त्यांनी काँग्रेस प्रवेश केला आहे. येत्या निवडणुकीत डिलायला लोबो शिवोलीतून तर मायकल लोबो हे कळंगुटमधून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवताना दिसले, तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही.
I welcome and congratulate Shri Michael Lobo, Smt Delilah Lobo and all their supporters for having taken a good decision of joining the Congress party, a decision towards the welfare of Goa & Goans: CLP Leader, Shri @digambarkamat. pic.twitter.com/89tmd88wtp
— Goa Congress (@INCGoa) January 11, 2022
रिकार्डोंना भाजपचं तिकीट?
दरम्यान, आता कळंगुटमधून भाजप कुणाला उमेदवारी देतं, हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जगप्रसिद्ध असलेल्या टिटोजचे सर्वेसर्वा रिकार्डो डिसूझा यांनीही फडणवीसांची भेट गोवा दौऱ्यादरम्यान घेतली होती. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयातही त्यांनी हजेरी लावत महत्त्वाची चर्चा दिल्लीतील भाजपच्या वरीष्ठ नेत्यांसोबत केली होती. आगामी काळात आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत, असं रिकार्डो यांनी म्हटलं होतं. मात्र अपक्ष लढणार की कुण्या पक्षाच्या तिकिटावर लक्षणार, हे रिकार्डो यांनी स्पष्ट केलं नव्हतं. अशातच आता मायकल लोबोंनी भाजप सोडल्यामुळे कळंगुटमधून रिकार्डो यांनी उमेदवारी भाजप देते का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.