Goa Elections: राहुल गांधी सकारात्मक, पण गोवा स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय? राऊतांची प्रपोजल मांडलं
महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडला का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, ते म्हणाले, 'आम्ही काही झोळी घेऊन उभे नाहीत त्यांच्यापुढे.....
नवी दिल्ली- सदीप राजगोळकर: गोवा विधानसभेवर आपले अस्तित्व दाखवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला यश आल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि राष्ट्रवादीने उडी घेतली आहे. मात्र गोव्यात काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. यावर शिवसेनेची काय भूमिका आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवरील चर्चेत काँग्रेस नेते राहूल गांधी (Rahul Gandhi) याबाबत सकारात्मक आहेत, मात्र स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय माहिती नाही, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले संजय राऊत?
महाविकास आघाडीचा प्रस्ताव काँग्रेससमोर मांडला का, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता, ते म्हणाले, ‘ आम्ही काही झोळी घेऊन उभे नाहीत त्यांच्यापुढे. आम्ही फक्त राहुल गांधींसमोर प्रपोझल ठेवलं. महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत, गोव्यातही एकत्र लढू. राहुल गांधींशी चर्चा झाली तेव्हा ते याबाबत सकारात्मक आहेत. पण स्थानिक काँग्रेस नेतृत्वाच्या डोक्यात काय वळवळतंय, माहिती नाही, असे संजय राऊत म्हणाले.
राऊत यांचा काँग्रेससमोर काय प्रस्ताव?
संजय राऊत यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारे उमेदवारी द्यायची याविषयीचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला. ते म्हणाले, आम्ही काँग्रेसला म्हणालो, 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा, उर्वरीत 10 जागांवर मित्रपक्ष- राष्ट्रवादी, शिवसेना असे लढू. गेव्यात ज्या जागांवर काँग्रेस याआधी कधीही जिंकू शकली नाही, त्या जागा आम्ही मागितल्या. खिशातलं काही मागितलं नाही. आज काँग्रेसचे तीन आमदारही नाहीत. होते ते सगळे पळून गेले. काँग्रेस सिंगल डिजिटमध्येही येणार नाही. आमच्यासारखे पक्ष काँग्रेसला आधार देत आहेत. पण स्थानिक नेत्यांच्या डोक्यात काय वळवळतंय माहिती नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
गोव्यात येत्या 14 फेब्रुवारी रोजी मतदान
गोव्यातील भाजप सरचे सरकार हटवण्याची गरज असून त्याकरिता एकत्रित पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली होती. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत आणि तेथील काँग्रेसचे नेते यांच्यात चर्चा सुरु आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली होती. काल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवणार अशी भूमिका मांडली. त्यानंतर आता शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेने महाविकास आघाडीचा प्रयोग गोव्यात साकारण्याकरिता राहुल गांधींसमोर प्रपोझल ठेवलंय, अशी माहिती दिली आहे. दरम्यान, गोव्यात येत्या 14 फेब्रुवारी रोजी 40 जागांसाठी मतदान होणार आहे. तर 10 मार्च रोजी निकाल जाहीर केले जातील. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे.
इतर बातम्या-