Goa Assembly Election : माझं काम नव्हतं तर इतर मतदार संघाचे पर्याय कसे दिले?; उत्पल पर्रिकरांचा फडणवीसांना सवाल
उत्पल पर्रिकरांचं काम नसल्याने त्यांना पणजी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारण्यात आली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती.
पणजी: उत्पल पर्रिकरांचं काम नसल्याने त्यांना पणजी विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी नाकारण्यात आली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांनी फडणवीसांच्या या आरोपावर पलटवार केला आहे. माझं काम नव्हतं तर इतर मतदारसंघाचे पर्याय कसे दिले? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला आहे.
उत्पल पर्रिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करत पणजीतून अपक्ष उमदेवार म्हणून लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पणजीत भाजपची डोकेदुखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण अपक्ष उमेदवार लढणार असल्याचं जाहीर करतानाच उत्पल यांनी देवेंद्र फडणवीसांवरही पलटवार केला आहे. मी कोणत्याही पक्षाचे पर्याय स्वीकारले नाहीत. माझे वडील फायटर होते. त्यामुळे मीही लढायचं ठरवलं आहे. माझं पणजीत काम नव्हतं तर मला इतर ठिकाणचे पर्याय का देण्यात आले? असा सवाल त्यांनी केला.
मला पर्यायच राहिला नाही
मनोहर पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकीट मागायचे असते तर मागच्यावेळीच मागितलं असतं. मात्र मागच्यावेळी पार्टीने जे सांगितलं तेच मी केलं. वडील सक्रिय असताना मी कधीच पुढे पुढे केलं नाही. वडिलांचं वजन वापरलं नाही. आता पक्षाने पणजीत असा उमेदवार दिला त्यावर बोलायला लाज वाटते. त्यामुळे मला पर्याय राहिला नाही मी निवडणूक लढत आहे. माझ्या वडिलांसोबतचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावा त्यांनी केला.
त्या ऑफरचा विचारही करू शकत नाही
यावेळी त्यांना शिवसेना आणि आपच्या ऑफरबाबतही विचारण्यात आलं. त्यावर माझ्या पार्टीच्या ऑफर घेतल्या नाही मी इतर पक्षाच्या ऑफरचा विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. माझ्यासाठी पर्याय मागत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
भाजप माझ्या मनात
अपक्ष निवडणूक लढत आहात, तर तुम्ही भाजप सोडणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्या मनात भाजप रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगत उत्पल यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला.
Fast News | महत्त्वाच्या घडामोडी | 21 January 2022 pic.twitter.com/jad1VrIbWp
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2022
संबंधित बातम्या: