Goa election | आप, तृणमूल आणि काँग्रेसचं फडणवीसांकडून वस्त्रहरण, वाचा कोणत्या पक्षावर कोणते आरोप!
फडणवीस म्हणाले की, गोव्यात आप आली आहे. आप केवळ सकाळापासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलत आहे. लोक या पक्षांना नाकारत आहे. दिल्लीत परिस्थिती काय आहे हे लोकांनी पाहिलं आहे.
पणजीः गोवा विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येत असून, गुरुवारी भाजप नेते (BJP) आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पणजीत पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्ष, (AAP) काँग्रेस (Congress) आणि एमजीपीचे (MGP) अक्षरशः वस्त्रहरण करून त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. हे सारे पक्ष केवळ भारतीय जनता पक्षासोबत संघर्ष करत असल्याचा दावा करायलाही ते विसरले नाहीत. जाणून घेऊयात फडणवीस काय म्हणाले ते.
काँग्रेससाठी गोवा पैसे कमवण्याची फॅक्ट्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, इतर पक्ष केवळ भाजपशी संघर्ष करत आहेत. या पक्षांचा इतिहास पाहा. काँग्रेसने अनेक वर्ष गोव्यावर राज्य केलं. 2007 ते 2012 च्या सत्ता काळात काँग्रेसने मोठे घोटाळे केले. गोव्याची प्रतिष्ठा धुळीला मिळवली. त्यांना सत्ता केवळ यासाठी हवी (बोलत असताना माईक बंद झाला. फडणवीस म्हणाले भाई हमारी आवाज कोण बंद कर सकता है यार) केवळ लुटीचं राजकारण सुरू करता यावे यासाठी काँग्रेसला गोवा हवं आहे. पैसे कमावणारी फॅक्ट्री करण्यासाठी काँग्रेसला गोव्याची सत्ता हवी आहे. गोव्यातील अनेक काँग्रेस नेते सोडून गेले आहेत. काँग्रेसची विश्वासहार्यता संपल्याचा आरोप त्यांनी केला.
तृणमूल सुटकेस घेऊन आली…
फडणवीस म्हणाले, तृणमूल गोव्यात आली. त्यांनी एमजीपीसोबत आघाडी केली आहे. टीएमसीने ज्या पद्धतीचं राजकारण केलं आहे. त्याला गोव्याने नाकारलं आहे. गोव्याने टीएमसीची आक्रमकता नाकारली आहे. टीएमसी सुटकेस घेऊन आली आहे. सुटकेसच्या भरवशावर त्यांनी राजकारण सुरू केलं आहे. गोवा एक मार्केट आहे आणि नेते मार्केटचे नेते विक्रीसाठी आहे, अशा प्रकारची वृत्ती टीएमसीने दाखवल्याचे ते म्हणाले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांना त्यांनी पक्षात घेतलं. लोक म्हणतात खरेदी केलं. मी असं म्हणणार नाही, पण लोकांच्या मनात तृणमूल काँग्रेसने मनात आत्मविश्वास निर्माण केला नाही. त्यांचा स्टँड अँटी हिंदू आणि अँटी काँग्रेस आहे. बंगालच्या निवडणुकीनंतर लोकांना ही सुटेबल पार्टी वाटत नाही. टीएमसी आणि एमजीपीच्या युतीमुळे एमजीपीचे नेते अस्वस्थ आहेत. काही एमपीजीपी नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आणि काहींनी भाजपमध्ये पक्ष सोडला. ही युती लोकांना भावली नसल्याचा दावा त्यांनी केला.
आप फक्त खोटे बोलते…
फडणवीस पुढे म्हणाले की, गोव्यात आप आली आहे. आप केवळ सकाळापासून संध्याकाळपर्यंत खोटं बोलत आहे. लोक या पक्षांना नाकारत आहे. दिल्लीत परिस्थिती काय आहे हे लोकांनी पाहिलं आहे. जगमगाती बिजली का नारा, असं केजरीवाल म्हणाले होते. पण वीज मिळाली नाही. इथे वारंवार बत्तीगुल होत आहे. लोकांना सबसिडी मिळत नाही. दिल्लीत पाणीपुरवठ्याची समस्या आहे. आश्वासन देऊनही त्यांनी पूर्ण केलं नाही. हर घर नल, ही मोदीची योजना त्यांनी अंमलात आणली. त्यात केजरीवाल सरकारचं योगदान नाही. मोहल्ला क्लिनिकचा गवगवा केला. त्यातील निश्चित आकडेवारी त्यांना गाठता आली नाही. मार्चमध्ये 220 मोहल्ला क्लिनिक बंद होते. कोरोना काळात या मोहल्ला क्लिनिकचा काहीच फायदा झाला नाही. गोव्यात आपने अनेक आश्वासन दिले. लोकांना त्यांचं सत्य माहीत आहे, असा दावा त्यांनी केला.
इतर बातम्याः
मै लडकी हूं, लड सकती हूं… उत्तर प्रदेश काँग्रेसची पोस्टर गर्ल भाजपच्या वाटेवर, काय घडलं कारण?
VIDEO: गोव्याबाबत शिवसेनेची काय आहे रणनिती? जागांबाबतची स्टॅटेजी काय?; राऊतांनी सांगितला प्लान