Karnataka Election Results 2023 : काँग्रेसचं ‘ऑपरेशन लोटस’ला ‘ऑपरेशन हस्था’ने प्रत्युत्तर; काय आहे ‘ऑपरेशन हस्था’?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला कमी जागा मिळाल्या आहेत. मात्र, तरीही भाजपकडून ऑपरेशन लोटस केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसनेही ऑपरेशन हस्था हाती घेतलं आहे.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला काँग्रेसने धोबीपछाड दिलं आहे. काँग्रेसला पहिल्या कलामध्ये बहुमत मिळालं आहे. काँग्रेसने 115 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 79 जागांवर आघाडी मिळाली आहे. मात्र, असं असलं तरी भाजप कर्नाटकात सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कर्नाटकात ऑपरेशन लोटस होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. त्यामुळे काँग्रेसने आपल्या आमदारांना रोखण्यासाठी खास प्लान तयार केला आहे. स्वत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आमदारांवर लक्ष ठेवून आहेत.
काँग्रेसने या ऑपरेशनचं नाव ऑपरेशन हस्था असं ठेवलं आहे. या ऑपरेशन हस्थाच्या माध्यमातून काँग्रेसने डिफेन्सची रणनीती तयार केली आहे. हे ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे अनेक नेते कामाला लागले आहे. त्यात डीके शिवकुमार, बीके हरिप्रसाद आणि खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश आहे. या तिन्ही नेत्यांनी कर्नाटकात तळ ठोकला आहे.
त्रिशंकू विधानसभा झाल्यास काय?
राज्यात त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली तर काय करायचं? याचा प्लानही ऑपरेशन हस्थामध्ये करण्यात आला आहे. त्रिशंकू विधानसभा झाल्यानंतर भाजप जेडीएसच्या आमदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करेल. अशावेळी भाजपचा हा डाव हाणून पाडण्याचं काँग्रेसने ठरवलं आहे. त्यासाठी खास रणनीती तयार केली आहे. खरगे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट मान्य केली आहे. राज्यात केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर जेडीएसच्या विजयी उमेदवारांकडेही आमचं लक्ष असेल असं खरगे यांनी म्हटलं आहे.
सल कायम
2018मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपला लोकसभा निवडणुकीत 25 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे केंद्रात सरकार बनवण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला होता. त्यासाठी भाजपने काँग्रेस आणि जेडीएसचे मिळून 17 आमदार फोडले होते. त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार आलं होतं. ऑपरेशन लोट्सला आपले आमदार बळी पडल्याची सल काँग्रेस नेत्यांच्या मनात आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता काँग्रेसने कंबर कसली असून ऑपरेशन हस्था तयार केलं आहे.
150 पेक्षा कमी जागा मिळाल्या तर
राज्यात काँग्रेसला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्यास भाजप काँग्रेसचे आमि जेडीएसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे राज्यात काँग्रेसवर संकट येऊ शकतं. म्हणून काँग्रेसने ऑपरेशन हस्थाच्या अंतर्गत सर्व काँग्रेसच्या आमदारांना सोबत ठेवण्याबरोबरच जेडीएसच्या आमदारांनाही सोबत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार फुटू नये म्हणून या आमदारांची विशेष काळजी घेणार जाणार आहे. काँग्रेसचे संकटमोचक डीके शिवकुमार आणि खरगे यांच्यावर आमदार सांभाळण्याची जबाबदारी आहे. हे दोन्ही नेते उमेदवारांशी चर्चा करत आहेत. त्यांच्यासोबत बैठका घेत आहेत. त्यांची मतेही जाणून घेतली जात आहेत. तसेच भाजपच्या अमिषाला बळी न पडण्याच्या सूचनाही देत आहेत.