कर्नाटक : कर्नाटकात काँग्रेस एकहाती सत्ता मिळवतानाचं चित्र दिसतंय. आतापर्यंतचे कल पाहता काँग्रेसने 100 चा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी (भाजपा) 76 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेता बसवराज बोम्मई यांनी पराभव स्वीकारला आहे. “आम्ही आमच्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलो नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यापुढे ते म्हणाले, “सर्व निकाल आल्यानंतर आम्ही विस्तृत विश्लेषण करू आणि एक राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या रुपात आम्ही विविध स्तरावरील आमच्या चुकांना पाहून त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू. लोकसभा निवडणुकीत आम्ही आणखी मेहनत घेऊन परतू.”
सुरुवातीचे कल पाहून उत्साहित झालेल्या काँग्रेसने म्हटलंय की भाजपाला हा संदेश मिळाला आहे की जनतेच्या मुद्द्यांवर टीकून राहणं महत्त्वाचं असतं. भाजपा नेता आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (शिग्गाव) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार (कनकपुरा) आपापल्या जागांवर आघाडीवर आहेत. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर हे हुबळी-धारवाड सेंट्रलमध्ये पिछाडीवर आहेत. आतापर्यंतचे निकार पाहून काँग्रेसने जल्लोषालाही सुरुवात केली आहे. “हा भाजपासाठी एक संदेश आहे की कृपया अशा मुद्द्यांवर त्यांनी टीकून राहावं, जे लोकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत आहेत. त्यांनी भारताचं विभाजन करण्याचा प्रयत्न करू नये”, अशी टीका काँग्रेस नेते पवन खेडा यांनी केली.
यावेळी कर्नाटकमध्ये विक्रमी 73.19 टक्के मतदान झालं. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पक्षाला बहुमत मिळेल, कुणाच्या मदतीची गरज लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तर काँग्रेस किमान 141 जागांवर विजय मिळवेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला होता.
भाजपच्या प्रचारात सर्व मदार मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होती. कर्नाटकात गेल्या 38 वर्षांपासून कोणत्याही सरकारला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारासाठी भरपूर मेहनत घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी झंझावाती प्रचार केला. तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांभाळली.