बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 च्या मतमोजणीआधीच कर्नाटकात राजकीय खळबळ उडाली आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीचे निकाल ( Karnataka assembly Election Result 2023 ) लागणार आहे. पण त्याआधीच काँग्रेस आणि भाजपने आपाल्या विजयाचा दावा केला आहे. असं असलं तरी जेडीएसच्या एका वक्तव्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे. एक्झिट पोल मध्ये कोणालाही बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे काँग्रेस किंवा भाजपला जर बहुमत मिळालं नाही तर त्यांना जेडीएसची मदत घ्यावी लागणार आहे. पण जेडीएसचे कुमारस्वामी यांनी पाठिंबा देण्याआधी अट ठेवली आहे.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनीही जेडीएसच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की एक्झिट पोलचा स्वतःचा सिद्धांत आहे. पण आम्हाला बहुमत मिळेल. मी जेडीएसचा विचार करत नाही, कुमारस्वामी स्वत: निर्णय घेण्यास मोकळे आहेत. माझ्याकडे कोणताही बॅकअप प्लॅन नाही, काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल हीच माझी योजना आहे.
कुमारस्वामी आणि डीके शिवकुमार यांच्यानंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही विजयाचा दावा केलाय. बोम्मई म्हणाले की त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता नाही, आम्ही पुन्हा सरकार स्थापन करणार आहोत. एक्झिट पोलनुसार डीके शिवकुमार त्यांच्या 141 जागांवरच खूश आहेत.
मतमोजणीपूर्वी भाजप आणि काँग्रेसने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. डीके शिवकुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि इतर भाजप नेत्यांनी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या बंगळुरू येथील निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
जेडीएस नेते कुमारस्वामी म्हणाले की, त्यांच्या पक्षाने निवडणुकीनंतर कोणाला पाठिंबा द्यायचा हे आधीच ठरवले आहे. ते म्हणाले की त्यांचा पक्ष कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी युती करण्यास तयार आहे, परंतु एक अट असेल. कुमारस्वामी यांना राज्याचे मुख्यमंत्री करावे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना मंत्री करावे लागेल.
मागच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याठी काँग्रेसने जेडीएसला पाठिेबा दिला होता. जास्त आमदार निवडून आले असताना ही काँग्रेसने जेडीएसचा मुख्यमंत्री केला होता. जेडीएसकडून कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. पण हे सरकार पाच वर्ष टिकू शकलं नव्हतं. काही आमदार फुटल्याने सरकार अल्पमतात येऊन पडलं. त्यानंतर भाजपने राज्यात सरकार स्थापन केलं होतं.
काँग्रेस – 99-109
भाजप – 88-98
जेडीएस- 21-26
इतर – 0-4
काँग्रेस – 100-112
भाजप – 83-95
जेडीएस- 21-29
इतर – 02-06