नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या 224 मतदारसंघांसाठी 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवार) होत आहे. निकालाचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसतंय. काँग्रेसने बहुमतचा आकडा (113) पार केला आहे. आतापर्यंतचे कल पाहता काँग्रेस 115 जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी (भाजपा) 76 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी बजरंग बलीच्या मुद्द्याचा हवाला देत भाजपावर निशाणा साधला आहे.
प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत लिहिलं, ‘बजरंग बलीनेही कर्नाटकमध्ये मोदीजींच्या मोहीमेला नाकारलं आहे. मीडिया जेपी नड्डाजी किंवा मुख्यमंत्री बोम्मईजींचा चेहरा अपयशाच्या रुपात दाखवत असलं तरी हे पंतप्रधान मोदीजींचं अपयश आहे. कारण त्यांनी संपूर्ण मोहीम स्वत:विषयी बनवली होती.’
काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात आरएसएसची युवा शाखा बजरंग दलसारख्या संघटनांवर बंदी आणण्याचं आश्वासन दिलं होतं. यावरूनच मोठा वाद सुरू झाला होता आणि भाजपाने त्याला भगवान हनुमानाचा अपमान असल्याचं म्हटलं होतं. तर काँग्रेसने भाजपावर बजरंग दलची तुलना बजरंग बलीशी केल्याचा आरोप केला होता. इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या रॅलीमध्ये कर्नाटकच्या मतदारांना मतदान करण्याआधी ‘बजरंग बली की जय’ची घोषणा देण्याचा आग्रह केला होता.
Even Bajrang Bali has given a thumbs down to Modi ji’s campaign in Karnataka. Media may show the face of JP Nadda ji or CM Bommai ji as losers but it is PM Modi’s loss since he made the entire campaign about himself.
— Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) May 13, 2023
यावेळी कर्नाटकमध्ये विक्रमी 73.19 टक्के मतदान झालं. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या नेत्यांची माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी पक्षाला बहुमत मिळेल, कुणाच्या मदतीची गरज लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तर काँग्रेस किमान 141 जागांवर विजय मिळवेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला होता.
भाजपच्या प्रचारात सर्व मदार मुख्यत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होती. कर्नाटकात गेल्या 38 वर्षांपासून कोणत्याही सरकारला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवता आलेली नाही. भाजपा आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रचारासाठी भरपूर मेहनत घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी झंझावाती प्रचार केला. तर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांभाळली.