लोकसभा निवडणूक 2024: प्रचाराला ब्रेक, उद्या मतदान, पहिल्या टप्प्यात आठ मंत्री, २०१९ मध्ये काय होती परिस्थिती
Lok Sabha Election 2024 News in Marathi: पहिल्या टप्प्यात देशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. त्यात ८ केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार बुधवारी संध्याकाळी संपला. शुक्रवारी देशभरातील १०२ जागांवर मतदान होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश आहे. राज्यातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या जागांवर उद्या १९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. प्रशासनाकडून मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी उद्या सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे.
नागपुरात नितीन गडकरीसह २६ उमेदवार रिंगणात
नागपुरात लोकसभा मतदारसंघात ६१ संवेदनशील मतदान केंद्र आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात ६३ संवेदनशील मतदान केंद्र आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण ४५१० मतदान केंद्र आहेत. नागपूर लोकसभा मतदारसंघात २१०५ मतदारसंघ, तर रामटेकमध्ये २४०५ मतदान केंद्र आहेत. नागपूर आणि रामटेक या दोन्ही मतदारसंघात ४२ लाख ७२ हजार ३६६ मतदार असून नागपूर लोकसभा मतदारसंघात २२ लाख २३ हजार २८१ मतदारांची नोंदणी झाली आहे. रामटेक मतदारसंघात २० लाख ४९ हजार ८५ मतदारांची नोंदणी झाली आहे. नागपूर मतदारसंघात ११ लाख १३ हजार १८२ पुरुष, आणि ११ लाख ९ हजार ८७६ महिला, २२३ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. रामटेक मतदारसंघात १० लाख ४४ हजार ८९१ पुरुष, १० लाख ४ हजार १४२ महिला, ५२ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. नागपुरात २६ तर रामटेकमध्ये २८ उमेदवार रिंगणात, तरी दोन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी थेट लढत आहेत.
देशभरातून आठ मंत्री रिंगणात
पहिल्या टप्प्यात देशातील १०२ जागांवर मतदान होत आहे. त्यात ८ केंद्रीय मंत्र्यांच्या जागांचा समावेश आहे. मोदी सरकारमधील मंत्री नितिन गडकरी, किरेन रिजिजू, सर्बानंद सोनोवाल, संजीव बालियान, जितेंद्र सिंह, भूपेन्द्र यादव, अर्जुन राम मेघवाल आणि एल मुरुगन यांचे भवितव्य उद्या मतपेटीत बंद होणार आहे. तसेच दोन माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब (त्रिपुरा) आणि नबाम तुकी (अरुणाचल प्रदेश) यांच्या जागेवर उद्या मतदान होणार आहे.
युपीए अन् एनडीएला किती जागा
2019 मध्ये यूपीएला 102 जागांपैकी 45 जागांवर विजय मिळवला होतो. एनडीएने 41 जागा जिंकल्या होत्या. पहिल्या टप्पात तमिळनाडू (39), उत्तराखंड (5), अरुणाचल प्रदेश (2), मेघालय (2), अंदमान आणि निकोबार द्विप समूह (1), मिझोरम (1), नागालँड (1), पुडुचेरी (1), सिक्किम (1) आणि लक्षद्वीप (1) जागेवर मतदान होणार आहे. तसेच राजस्थानमध्ये 12, उत्तर प्रदेशात 8, मध्य प्रदेशात 6, आसम आणि महाराष्ट्रात 5-5 जागांवर मतदान होणार आहे. बिहारमधील 4, पश्चिम बंगालमध्ये 3, मणिपूरमध्ये 2, जम्मू-कश्मीर आणि छत्तीसगड आणि त्रिपुरामध्ये एक-एक जागेवर मतदान होणार आहे.