Devendra Fadnavis : ‘मी हरणार नाही….’, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्त्वाचे मुद्दे
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांनी सरकारमधून मोकळ करण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. महाराष्ट्रात भाजपाचा दारुण पराभव झाला आहे.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीचा दारुण पराभव झाला. महायुतीला अवघ्या 17 जागा मिळाल्या. त्यात भाजपाला फक्त 9 जागा मिळाल्या. त्याचवेळी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं. मविआने 31 जागा जिंकल्या. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रातून सर्वाधिक खासदार येतात. भाजपाला केंद्रात पूर्ण बहुमत मिळालं नाही, त्याला महाराष्ट्रात महायुतीच्या कमी झालेल्या जागा हे सुद्धा कारण आहे. भाजपाचा महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे. आज भाजपाची एक बैठक झाली. त्यात पक्षाच्या कामगिरीवर मंथन करण्यात आलं. त्यानंतर पत्रकार परिषेदत देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेले 5 महत्त्वाचे मुद्दे.
“पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी स्वीकारतो. मी मान्य करतो, मी स्वत: कमी पडलोय. भाजपाला झटका बसला. महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस म्हणून मी स्वीकारतो. आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायच आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की, मला सरकारमधून मोकळ करावं. जेणेकरुन, मला पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची संधी मिळेल. मी हरणार नाही. पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार”
“निवडणुकीचं एक अर्थमॅटिक्स असतं. त्यात आम्ही पराजित झालो असं माझं मत आहे. त्याच्या बऱ्याच मिमांसा असतात. त्या आम्ही करू. पण महाविकास आघाडीला जवळपास 30 जागा मिळाल्या. त्यांचं मतदान आहे. 43.30 टक्के आणि आम्हाला मिळालेलं मतदान आहे 43.60 टक्के. म्हणजे अर्ध्या टक्क्यापेक्षा देखील कमी फरकाने आम्ही वरचढ आहोत. पण सीटची संख्या त्यांची 30 आहे आणि आमची 17 आहे”
“महाविकास आघाडीला 2 कोटी 50 लाख मते मिळाली. महायुतीला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. म्हणजे दोन लाख मते त्यांना फक्त जास्त मिळाली आहेत”
“मुंबईचा विचार केला तर मुंबईत महाविकास आघाडीला चार जागा आणि आम्हाला दोन जागा मिळाल्या आहेत. महाविकास आघाडीला मुंबईत 24 लाख 62 हजार मते आहेत. आणि महायुतीला 26 लाख 67 हजार मते आहेत. म्हणजे मुंबईत दोन लाख मते आम्हाला जास्त मिळाली आहेत”
“भाजपचा विचार केला तर आमच्या 8 जागा अशा आहेत की, त्या चार टक्क्यापेक्षा कमी फरकाने हरलो. सहा जागा 30 हजाराच्या फरकाने हरलो. काही जागा तर दोन हजार आणि चार हजार मताने हरलो आहोत. याचा अर्थ ही निवडणूक घासून झाली”