Ahmednagar Exit Poll 2024 : अहमदनगरमध्ये निलेश लंके यांचा जलवा, विखेंच्या वर्चस्वाला मोठा धोका
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा झटका बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारी सांगत आहे. इथे विखे पाटलांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण निलेश लंके या मतदारसंघात आघाडीवर आहेत.
लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला समोर येणार आहे. त्याआधी आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडलं. त्यानंतर आता एक्झिट पोलचे अंदाज समोर येत आहेत. टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या अंदाजानुसार, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत. विखे पाटील हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, सुजय विखे पाटील हे पिछाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत. एक्झिट पोलची आकडेवारी हा अंदाज आहे. मुख्य निकाल हा येत्या 4 जूनला स्पष्ट होणार आहे.
टीव्ही 9 पोलस्ट्राटच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला सर्वाधिक 25 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 22 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तसेच एका अपक्ष उमेदवाराला विजय मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला एकाही जागेवर विजय मिळणार नाही. महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला सर्वाधिक 18 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ ठाकरे गटाला 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर शरद पवार गटाला 6, काँग्रेसला 5, शिंदे गटाला 4 आणि अजित पवार गटाला एकाही जागेत यश मिळणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण आघाडीवर?
- नागपूर – भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर, काँग्रेसचे विकास ठाकरे पिछाडीवर
- बीड – भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे आघाडीवर, शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे पिछाडीवर
- चंद्रपूर – भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर
- बारामती – शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आघाडीवर, अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार पिछाडीवर
- अहमदनगर – शरद पवार गटाचे निलेश लंके आघाडीवर, भाजपचे सुजय विखे पिछाडीवर
- मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघ – काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आघाडीवर, भाजपचे उज्ज्वल निकम पिछाडीवर
- सांगली – ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील पिछाडीवर, अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर
देशात स्थिती काय?
महाराष्ट्राची आकडेवारी महायुतीला धक्का देणारी असली तरी देशात महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला देशभरात 353 ते 368 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 188 ते 133 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना 43 ते 48 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.