Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : शिंदे गटात भाजपबाबत अंतर्गत नाराजी?
लोकसभेच्या जागा वाटपावरुन शिंदेंच्या शिवसेनेतली नाराजी समोर आलीय. सर्व्हेचं कारण देत भाजप शिंदे गटाच्या जागा स्वत: ओढत असल्याच्या तक्रारी शिंदे गटाकडून सुरु झाल्या आहेत.
लोकसभेच्या जागा वाटपावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेतच भाजप संदर्भात नाराजी सुरु झाल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वत:कडे खेचल्यानं नाराजी असल्याची चर्चा आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वत:कडे घेतल्याची शिंदे गटातून तक्रारी असल्याचं कळतंय. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. नेत्यांचं खच्चीकरण होतं असल्याची शिंदे गटात चर्चा आहे. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे आलो, आता अशी वागणूक नको; नेत्यांकडून खंत व्यक्त झाल्याचंही कळतंय. लोकसभेच्या जागावाटपात अशी स्थिती मग विधानसभेला काय होणार? अशी शंकाही आमदार, खासदारांनी व्यक्त केल्याचं कळतंय
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप 28-29 जागांवर लढण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेला 13-14 जागा, अजित पवार गटाला 6 जागा आणि जानकरांच्या रासपला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून आधी 22 जागांची आणि नंतर 18 जागांची मागणी झाली. पण एवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील अशी चिन्हं नाहीत.
कोणती जागा भाजप किंवा अजित पवार गटाला गेली किंवा जावू शकतात?
- अमरावतीची जागा शिंदे गटाची होती. ही जागा भाजपकडे गेलीय
- रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागाही धनुष्यबाण चिन्हाचीच आहे. इथं शिंदे गटाच्या किरण सामंतांचा दावा आहे. पण ही जागाही भाजपकडे जाणार असून नारायण राणेंचा तिकीट मिळण्याची शक्यता आहे
- दक्षिण मुंबईची जागेवरही धनुष्यबाण चिन्हावरच अरविंद सावंत निवडणूक आले. ते आता उद्धव ठाकरेंसोबत असले तरी ही जागा शिवसेनेचीच असल्यानं या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे. मात्र ही जागा भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे.
- शिरुरमध्ये 2019 ला शिवसेना लढली होती. आता ही जागा महायुतीत अजित पवार गटाला गेलीय
- 2019नुसार परभणीची जागाही धनुष्यबाण चिन्हाचीच आहे. मात्र ही जागा जानकरांच्या रासपला जाण्याची शक्यता आहे
- धाराशीवमध्येही 2019 ला युतीत शिवसेनेला जागा सुटली होती आता ही जागा अजित पवार गटाला जाण्याची शक्यता आहे
‘जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत’, भाजपचा दावा
शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत नाराजीच्या चर्चेवरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिलीय. “शिंदे आणि फडणवीस यांच्यात जागावाटपावरून कोणतेही मतभेद नाहीत. यासंदर्भातील बातमी धादांत खोटी आहे. उलट एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघेही एकत्रितपणे प्रत्येक जागा कशी जिंकता येईल, याची आखणी करीत आहेत. सर्वांचं ध्येय एकच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना महाराष्ट्रातून सर्वाधिक जागा देणे, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिलीय. भाजपवरुन शिंदेंच्या शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही”, असं बावनकुळेचं म्हणणं आहे. अर्थात आता जागावाटपाच्या घोषणेनंतर शिंदे गटाच्या किती जागा भाजपकडे जाणार हे स्पष्ट होईल.