‘…तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊ’, निवडणूक आयोगाची महत्त्वाची माहिती
"पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे. यासाठी 20 मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झालीय. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. आतापर्यंत रामटेक - 1 , भंडारा-गोंदिया 2, गडचिरोली-चिमूर - 2, चंद्रपूर - 0 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत", अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आतापर्यंत राज्यातील कोणत्या मतदारसंघात किती उमेदवारांनी अर्ज भरला आहे, निवडणूक आयोगाची तयारी कशी सुरु आहे, तसेच आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कशी कारवाई केली जात आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी एस. चोक्कलिंगम यांना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारण्यात आला. मनोज जरांगे यांच्या समर्थक आंदोलकांकडून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन प्रत्येक मतदारसंघात शेकडो जणांकडून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचा दावा केला जातोय. असं झाल्यास निवडणूक आयोगावर ताण पडू शकतो का? असा प्रश्न मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.
“कुठल्याही परिस्थितीत आम्ही इलेक्शनचं काम पूर्ण करु. EVM ची कपॅसिटी 300 उमेदवारांची आहे. 300च्या वर जर उमेदवार गेले तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार”, अशी भूमिका मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मांडली. “पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला निवडणुका पार पडणार आहे. यासाठी 20 मार्चला अर्ज घेण्यास सुरुवात झालीय. तर अर्ज मागे घेण्याची तारीख 30 मार्च आहे. आतापर्यंत रामटेक – 1 , भंडारा-गोंदिया 2, गडचिरोली-चिमूर – 2, चंद्रपूर – 0 इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. वर्किंग डेस कमी आहेत, त्यामुळे ते बघून अर्ज करावे. 17 मार्च ते 22 मार्च या एका आठवड्यात 1 लाख 84 हजार नवीन मतदारांची नोंदणी झालीय. आणखी मुदत बाकी आहे. लवकरात लवकर नवीन मतदारांनी नोंदणी करा”, असं आवाहन त्यांनी केलं.
आतापर्यंत किती जणांवर कारवाई?
“आतापर्यंत 308 बिना परवान्याच्या शस्त्रास्त्रे जप्त केले आहेत. राज्यात 77 हजार 148 परवाने दिले गेले आहेत. त्यातील 45 हजार 755 शस्त्रास्त्रे ताब्यात घेण्यात आलीय. 13 हजार इसमांवर कारवाई करण्यात आलीय. मतदानाच्या दिवशी पेड हॉलिडे द्यावी. मतदानाच्या दिवशी dry day जाहीर झालाय. 85 वर्षांवरील नागरिकांना गृह मतदानाची सुविधा असेल”, अशी माहिती एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
कारवाईतून किती पैसे जप्त?
“आचारसंहिता सुरु झाल्यापासून आतापर्यंच कोट्यवधी रुपये विविध कारवाईतून जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई उपनगरातून सर्वात जास्त कॅश जप्त करण्यात आली आहे. मुंबई उपनगरातून तब्बल 3 कोटी 60 लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. जिल्हा स्तरावर कारवाई सुरू आहे. आम्ही भारतीय निवडणूक आयोगापर्यंत तक्रारी पोहोचवतोय. 98 हजार अंतर्गत पोलीस स्टेशन आहेत”, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली.