मतमोजणी सुरु होण्यापूर्वी बड्या अधिकाऱ्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पदावरुन उचलबांगडी
Lok Sabha Election: कट्यारे यांच्या तक्रार अर्जानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले होते. त्यानंतर शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यापूर्वी त्याची सहायक निवडणूक अधिकारीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यापूर्वी मोठी कारवाई झाली आहे. निवडणूक आयोगाने खेडच्या प्राताधिकाऱ्यांची उचलबांगडी केली आहे. प्रातांधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचा लेटर बॉम्ब त्यांचा अंगलट आला. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शिरूर लोकसभेच्या मतमोजणीला काही तास उरले असताना निवडणूक आयोगाने खेडचे प्रांताधिकाऱ्यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी पदावरून उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी सारथीचे उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांची सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून वर्णी लावण्यात आली आहे.
काय होता जोगेंद्र कट्यारे यांचा लेटर बॉम्ब
खेडचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीत अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. त्यांच्या बदलीची मागणी थेट निवडणूक आयोगाकडे त्यांनी केली होती. हे पत्र समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. मात्र निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची बदली करण्याऐवजी थेट कट्यारे यांना बडतर्फ केले आहे.
काय केले होते आरोप
प्रातांधिकारी कट्यारे यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सुहास दिवसे हे खेड आळंदीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. ते राजकीय प्रभावातून काम करत आहेत, असा आरोप केला होता.
कट्यारे यांच्या तक्रार अर्जानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्तांनी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना दिले होते. त्यानंतर शिरुर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होण्यापूर्वी त्याची सहायक निवडणूक अधिकारीपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव यांच्यात लढत होत आहे.