Exit Polls 2024: एग्झिट पोल 2019 मध्ये कसे होते, मोदी सरकार बाबत काय होती भविष्यवाणी?
exit poll in 2019: 2019 मधील लोकसभा निवडणुकीत बहुतांशी एग्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता. 2019 मधील एग्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यानंतर मतमोजणीनंतर ही भविष्यवाणी खरी ठरलेली दिसली.
लोकसभा निवडणूक 2024 चा शेवटचा टप्पा आज पूर्ण होत आहे. गेल्या 43 दिवसांपासून सुरु असलेली निवडणुकी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. लोकसभेसाठी 19 एप्रिल रोजी पहिला टप्पा झाला होता. आता 1 जून रोजी शेवटचा टप्पा होत आहे. आता सर्वांच्या नजरा एग्झिट पोलकडे लागल्या आहेत. आज संध्याकाळी एग्झिट पोलचे निकाल येणार आहेत. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा फैसला समजणार आहे. परंतु यापूर्वी 2019 मध्ये झालेल्या एग्झिट पोलचे निष्कर्ष काय होते. तेव्हाचे निष्कर्ष खरे ठरेल होते का?
आज संध्याकाळी येणार एग्झिट पोल
एग्झिट पोल मतदारांची केलेली कल चाचणी आहे. या कलचाचणीचे विश्लेषण करुन देशात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? याचा अंदाज तयार केला जातो. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, कोणत्याही निवडणुकीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोल दाखवले जाते. आता 1 जून रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी 5 वाजेनंतर एग्झिट पोलचे निष्कर्ष येणार आहेत.
एनडीएला तिसऱ्यांदा सत्ता मिळणार का?
2024 मधील लोकसभा निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीत झाली. एनडीएने तिसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार मोहीम राबवली. काँग्रेसच्या प्रचार मोहिमेची बाजू राहुल गांधी यांनी सांभाळली. 2024 च्या एग्झिट पोलचे निष्कर्ष आज येणार आहे. परंतु यापूर्वी 2019 मधील लोकसभा निवडणुकीचे एग्झिट पोल काय होते?
संस्था | एनडीए | युपीए | अन्य |
1. News18-IPSOS | 336 | 82 | 124 |
2. India Today-Axis My India | 339-365 | 77-108 | 82 |
3. News24-Todays Chanakya | 350 (+/-14) | 95 (+/-9) | 97 (+/-11) |
4. Times Now-VMR | 306 | 132 | 104 |
5. India TV-CNX | 300 (+/-10) | 120 (+/-5) | 122 (+/-6) |
6. ABP-CSDS | 277 | 130 | 135 |
7. India News-Polstrat | 287 | 128 | 127 |
8. CVoter | 287 | 128 | 127 |
9. Newsx Neta | 242 | 164 | —- |
काय होते 2019 मधील एग्झिट पोल
2019 मधील लोकसभा निवडणुकीत बहुतांशी एग्झिट पोलचा अंदाज खरा ठरला होता. 2019 मधील एग्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीच्या विजयाची भविष्यवाणी करण्यात आली होती. त्यानंतर मतमोजणीनंतर ही भविष्यवाणी खरी ठरलेली दिसली. 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने 543 पैकी 353 जागेवर विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. भाजपलाच 303 जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये भाजपाला 282 जागा मिळाल्या होत्या. 2019 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीए आघाडीला 91 जागा मिळाल्या होत्या.